स्वच्छता अभियानात महापालिकेला मिळाले हे मानांकन - This rating was given to the Municipal Corporation in the cleaning campaign | Politics Marathi News - Sarkarnama

स्वच्छता अभियानात महापालिकेला मिळाले हे मानांकन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात भाग घेतला आहे. या सर्वेक्षणामध्ये 2021चे "ओडीएफ प्लस प्लस' मानांकन मिळाले आहे. हे मानांकन "फाइव्ह स्टार' मानांकन मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

नगर : महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात भाग घेतला आहे. या सर्वेक्षणामध्ये 2021चे "ओडीएफ प्लस प्लस' मानांकन मिळाले आहे. हे मानांकन "फाइव्ह स्टार' मानांकन मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

मागील वर्षी महापालिकेला "ओडीएफ प्लस प्लस' मानांकन मिळाले होते. त्यासाठी शहरातील 32 सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण केले होते. त्यामधील सार्वजनिक शौचालयाला सर्वोत्कृष्ट शौचालय म्हणून घोषित करण्यात आले होते. सन 2020-21 या वर्षी स्वच्छ भारत अभियानामध्ये महापालिकेने "फाइव्ह स्टार' मानांकनासाठी भाग घेतला आहे.

शहरातील सार्वजनिक शौचालयांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वच 32 सार्वजनिक शौचालये अत्युत्कृष्ट दर्जाची आढळून आल्याने "फाइव्ह स्टार' मानांकनासाठी याची मदत होणार आहे. या कामी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त, घनकचरा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या मेहनतीला यश मिळाल्याची माहिती स्वच्छ संरक्षण कक्षप्रमुख पी. एस. बिडकर यांनी दिली. 

हेही वाचा.. 

संपदा पतसंस्था संचालकांच्या मालमत्तेच्या लिलावाचा आदेश 

नगर : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या 32 कोटी रुपयांच्या ठेवी व्याजासह परत देण्यासाठी संचालकांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी दिला आहे. 

ज्ञानदेव वाफारे अध्यक्ष असलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या 32 कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. ठेवीदार संध्या खुळे, चंद्रकांत खुळे, धनंजय पांडकर, अमरसिंग परदेशी, करीम शेख, अशोक सोनार, मंगल सोनार, माणिक कळसकर आदींनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचामध्ये ठेवींची रक्कम परत मिळण्यासाठी खटला दाखल केला होता.

ग्राहक मंचाने ठेवींची रक्कम परत देण्यासाठी "संपदा'चे अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे यांच्यासह संचालकांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. नगर तहसीलदारांनी संचालकांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी प्रक्रियाही सुरू केली होती. लिलावधारकांकडून स्थावर मालमत्तेच्या 25 टक्के रक्कम भरून घेतली होती. 
ज्ञानदेव वाफारे यांनी लिलाव प्रक्रियेला स्थगिती मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने ती फेटाळल्याने संचालकांच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती ऍड. सुरेश लगड यांनी दिली. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख