राठोड यांच्या निधनामुळे निर्मळ मनाचा चांगला मित्र गमावला : थोरात - Rathod's death loses Nirmal Mana's best friend: Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

राठोड यांच्या निधनामुळे निर्मळ मनाचा चांगला मित्र गमावला : थोरात

मुरलीधर कराळे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

गरिबांप्रती त्यांची असलेली तळमळ, संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क या बळावर सलग पंचवीस वर्ष नगर शहराचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. अनिल भैय्या हे सरळमार्गी होते.

नगर : माजी मंत्री व २५ वर्ष नगर शहराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांचे अकस्मित निधन धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे निर्मळ मनाचा चांगला मित्र गमावला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अऩिल राठोड यांचे आज ह्यदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिस अधीक्षक संदीप मिटके व पोलिस कर्मचाऱ्यांनी तोफांची सलामी दिली. या वेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

राठोड यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मंत्री थोरात यांनी मुंबईतून संदेश दला आहे. त्यांनी म्हटले आहे, की गरीब कुटुंबातून आलेले अनिल भैय्या राठोड कायम तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जात असत. गरिबांप्रती त्यांची असलेली तळमळ, संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क या बळावर सलग पंचवीस वर्ष नगर शहराचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. अनिल भैय्या हे सरळमार्गी होते. विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. सर्वसामान्य माणसांमध्ये अगदी सहजतेने ते वावरत असत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सामान्य माणसांशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांच्या निधनाने नगर शहर तर पोरके झाले आहे. त्यासोबतच एक समृद्ध राजकीय आणि सामाजिक जीवन जगणारा मित्रही आम्ही गमावला आहे. अनिल भैय्या राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राठोड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे थोरात म्हणाले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख