शिर्डी : देशभरात राष्ट्रीय समाज पक्षाचे एक कोटी सदस्य ऑनलाइन पद्धतीने करायचे. आगामी निवडणुकीत दोन खासदार व 50 आमदार निवडून आणायचे, असा संकल्प पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय अधिवेशनात सोडण्यात आला. त्यादृष्टीने कामाला लागा, असे आवाहन पक्षाचे संस्थापक सदस्य व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे दोन दिवसीय अधिवेशन रविवारी येथे झाले. सदस्य नोंदणीसाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरचे उद्घाटन जानकर यांच्या हस्ते झाले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, महासचिव कुमार सुशील, प्रसन्ना कुमार, संघटक बाळकृष्ण लेंगरे, गोविंदराम सुरनर, डॉ. रत्नाकर गुट्टे आदी उपस्थित होते.
जानकर म्हणाले, की पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मोहीम हाती घेऊन पक्षाची सदस्यसंख्या एक कोटीपर्यंत वाढवावी. रिक्त पदांवर नियुक्त्या करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करावा. 17 राज्यांतील प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. त्यात महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार व दिल्ली येथून आलेल्या सदस्यांची संख्या लक्षणीय होती. बाळासाहेब दोडताले, नितीन धायगुडे, शरद बाचकर, नानासाहेब जुंधारे, सुवर्ण जऱ्हाड, बाबा शेख, कपिल लाटे व नानासाहेब कोळपे यांनी नियोजन केले.
हेही वाचा...
आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्याचे प्रयत्न व्हावे
नगर : आदिवासी समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आदिवासी योजना माहिती कक्ष स्थापन करावा. त्या माध्यमातून गाव, शहर, जिल्हास्तरावर शासकीय कार्यालयात योजनेबाबत जनजागृतीसाठी कक्ष स्थापन करावा, अशी मागणी आदिवासी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे, की आदिवासी समाज गावकुसाबाहेर राहतो. शासकीय योजनांची माहितीच त्याच्यापर्यंत पोचत नाही. त्यामुळे योजनांपासून आदिवासी समाज वंचित राहतो. खावटी योजनेसंदर्भात पुढील रुपरेषा काय आहे, या योजनेचा फायदा मिळणार की नाही, याबाबत समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न व्हावेत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मदत व्हावी, अशी मागणी केली आहे. जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, उपजिल्हाध्यक्ष गणेश खोकले, स्वप्नील गायकवाड आदी उपस्थित होते.
Edited By - Murlidhar Karale

