कर्जत : दूध दरवाढीसाठी राज्यभर भारतीय जनता पक्षाने आज आंदोलन केले. भाजप नेत्यांनी सरकारवर कडाडून टीका करून शेतकऱ्यांची बाजू मांडली. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी तर सरकारवर टीका करताना, ``हे सरकार तिघाडीचे असून, एका नवऱ्याच्या दोन बायका असे आहे,`` असे म्हणून जोरदार टोला लगावला.
प्रा. शिंदे म्हणाले, ``एका नवऱ्याच्या दोन बायका असे हे तिघाडीचे सरकार आहे. त्यांना शेतकऱ्यांचे काहीही घेणेदेणे नाही. त्यांचे सर्व आटोपले असून, कारभारी घरात बसून प्रपंच कसा चालणार. हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले असून, ते कधी कोसळेल, हे सांगता येत नाही. सध्या कोरोनामुळे दुधाला रास्त भाव मिळण्याबरोबरच इतर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असून, दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू.``
कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे प्रा. शिंदे यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. या वेळी प्रतिकात्मक दगडाला दुधाचा अभिषेक घालून काही काळ रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, उपसभापती प्रकाश शिंदे, रासपचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी, ज्येष्ठ नेते सुनील यादव, अंगद रुपनर आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, की या आघाडी सरकारने गेल्या सात- आठ महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देणारे कोणतेच निर्णय घेतले नाहीत. दूध घेताना कमी भावात घेतले जाते, मात्र नंतर वाढीव दराने विक्री केली जाते. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. युरिया वेळेवर नाही, विजेचा खेळखंडोबा झाला, असे हे निष्क्रिय सरकार आहे. या वेळी प्रशासनाच्यावतीने पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले.
Edited By - Murlidhar Karale

