प्रा. राम शिंदे यांची भावनिक पोस्ट, दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करणारी - Ram Shinde's emotional post, giving way to deep emotions | Politics Marathi News - Sarkarnama

प्रा. राम शिंदे यांची भावनिक पोस्ट, दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करणारी

वसंत सानप
सोमवार, 6 जुलै 2020

भाऊंनी गावातच पाटलांच्या घरी वीस-पंचवीस वर्ष साल घातलं; घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील भाऊंनी दिवस-रात्र काबाडकष्ट करून मला लहानाचं मोठं करून मला उत्तम शिक्षण मिळण्यासाठी रक्ताच पाणी केलं.

जामखेड : भाजपचे माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांचे वडील शंकरराव यांच्यांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर प्रा. शिंदे यांनी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. त्याद्वारे त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

``'मोठी होती तुमची छाया, निर्मळ होती तुमची माया 
सदैव ह्यदयात राहील, तुमची पवित्र काया
भाऊ तुम्हीच होता, माझ्या कर्तुत्वाचा पाया"
अशी भावणिक साद घालणारी पोस्ट सर्वांच्या मनाला चुटपूट लावून गेली. शनिवारी (ता. 4) प्रा. शिंदे यांचे वडील शंकरराव शिंदे यांचे निधन झाले. रविवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर चौंडी (ता. जामखेड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण शिंदे परिवारावरच नव्हे, तर तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. माजी मंत्री राम शिंदे यांच्या डोक्यावर छत्र हरपले. जीवनाला आकार देण्यासाठी आयुष्यभर मोठे कष्ट सोसलेले त्यांचे वडील शंकरराव यांच्या आठवणी दिवसभर चौंडीकरांनी चर्चिल्या. यासंदर्भात प्रा. शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

शिंदे यांच्या यशाचे श्रेय वडिलांनाच...

माजी मंत्री शिंदे म्हणाले, " आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी जे काही यश संपादन केलेले आहे, त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या वडिलांनाच जाते. वडीलोपार्जीत अल्पभुधारक कोरडवाहू क्षेत्र, अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला पुंजलेले. आयुष्यभर भाऊंनी (शंकरराव) कष्ट सोसले. वयाच्या अठराव्या वर्षापासूनच वयाचे अर्धशतक ओलांडेपर्यंत भाऊंच्या हातचं काम सुटलं नाही. भाऊंनी गावातच पाटलांच्या घरी वीस-पंचवीस वर्ष साल घातलं; घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील भाऊंनी दिवस-रात्र काबाडकष्ट करून मला लहानाचं मोठं करून मला उत्तम शिक्षण मिळण्यासाठी रक्ताच पाणी केल. चांगली शिकवण दिली, माझ्यावर चांगले संस्कार केले. नैतिकता, सचोटीने वागायला देखील शिकवलं. जगाच्या कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही, असे शिक्षण मला भाऊंच्या आयुष्याकडे पाहून मिळाले. भाऊंच्या आशीर्वादामुळेच मी माझे जनसेवेचे कार्य आतापर्यंत सुरळीतपणे पार पाडत आलो आहे. आज जरी भाऊ माझ्या सोबत नसले, तरी त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव माझ्या सोबत असणार आहे. भाऊ तुमच्या मार्गदर्शनापासून मी वंचित झालो, याची खंत वाटते. तुम्ही दिलेली संस्कारांची वाट कधीच सोडणार नाही."

दरम्यान, राम शिंदे यांचे सांत्वन करण्यासाठी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार तसेच जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी हजेरी लावली. स्थानिक कार्यकर्ते, नागरिकही मोठ्या प्रमाणात येत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख