राळेगणचा फार्म्युला ठरला ! पारनेर तालुक्यातील 50 गावे बिनविरोध शक्य - Ralegan's formula became! 50 villages in Parner taluka unopposed possible | Politics Marathi News - Sarkarnama

राळेगणचा फार्म्युला ठरला ! पारनेर तालुक्यातील 50 गावे बिनविरोध शक्य

एकनाथ भालेकर
शनिवार, 19 डिसेंबर 2020

शुक्रवारी सुपे येथे बैठकीत राळेगणसिद्धीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची भुमिका घेत आमदार लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता.  हजारे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राळेगण सिद्धी : आमदार निलेश लंके व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात आज येथे झालेल्या बैठकित राळेगणसिद्धी ग्रामपंचायतची निवडणुक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब होऊन दोन्ही गटांतील जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित करण्यात आला. तसेच तालुक्यातील किमान 50 गावे बिनविरोध होऊ शकतात, याबाबत प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शुक्रवारी सुपे येथे बैठकीत राळेगणसिद्धीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची भुमिका घेत आमदार लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता.  हजारे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

बिनविरोधची भूमिका स्वागतार्ह : हजारे

हजारे म्हणाले, की गावाच्या विकासासाठी संकुचित विचार न करता सर्वांनी दुरदृष्टी ठेवली पाहिजे. ग्रामपंचायत निवडणुकांत झालेल्या मतभेदाचे लोन पाच वर्षे चालू राहतात. त्याचा गावाच्या एकूण ग्रामविकासावर परिणाम होतो. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे देशात जात, पात, वंश यांच्यात द्वेष वाढत आहे. शेजाऱ्यांत मतभेद - मारामाऱ्या होतात. निवडणुकातुन वाढत असलेली द्वेष भावना देशाला हितकारक नाही. राजकिय पक्षांमध्ये मतभेद, द्वेष वाढतात, हा देशाला मोठा धोका आहे. आमदार लंके यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याची घेतलेली भुमिका निश्चित स्वागतार्ह आहे. त्यातून राज्य व देशाला चांगली दिशा मिळू शकेल.

हजारे, पवार यांचा तालुका आदर्शच घडविणार

आमदार लंके म्हणाले, की पारनेर मतदार संघ हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचा मतदार संघ आहे. मी आमदार असलो, तरी जनसेवक आहे. काल सुपे गटातील ३० ग्रामपंचायतीतील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यापैकी १३ गावात बिनविरोध निवडणुका होऊ शकतील. आज टाकळीढोकेश्वर गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्याची सुरूवात राळेगणसिद्धीतून झाल्याचा आनंद वाटतो.

गरीब विद्यार्थ्यांना मदत करणार

या वेळी लंके यांनी ज्या ग्रामपंचायतीशी चर्चा झाली आहे, त्याचा आढावा हजारे यांना दिला. ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध होत असल्याने निवडणूक खर्चात वाचलेला पैसा गरिब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्याचे आवाहन माजी उपसरपंच लाभेश औटी यांनी केले.

औटी 50 हजार देणार

औटी यांनी स्वतः ५० हजार रूपये त्यासाठी देणार असल्याचे जाहिर केले. हजारे यांच्या संकल्पनेतून लवकरच त्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला जाणार असल्याचे औटी म्हणाले. हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धीचा विकास झाला. त्यांच्या विचारांना साजेसे काम एकोप्याने व्हावे, यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णयाला आपण पाठिंबा दिल्याचे सरपंच जयसिंग मापारी व उद्योजक सुरेश पठारे यांनी भाषणात सांगितले.

या वेळी माजी सरपंच सदाशिव मापारी, शरद मापारी, दादा पठारे, दत्ता आवारी, गणेश हजारे, किसन मापारी, रोहिदास पठारे, भाऊ गाजरे, दादा गाजरे, गिताराम औटी, रामहरी भोसले, विजया पठारे, विजय पोटे,अनिल उगले, रूपेश फटांगडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असा ठरला फॉर्म्युला

सुपे येथे झालेल्या बैठकीतच  राळेगणसिद्धीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला होता. त्यात ९ जागांपैकी माजी उपसरपंच लाभेष औटी यांच्या गटाला ४ जागा व अगोदर दोन वर्षे सरपंचपद तर माजी सरपंच जयसिंग मापारी यांच्या गटाला ५ जागा  व नंतर तीन वर्षे सरपंचपद देण्यावर एकमत झाले. उपसरपंच पद ज्या गटाचा सरपंच असेल त्यावेळी ते दुसऱ्या गटाकडे असेल यावर एकमत झाले.
 

दरम्यान, पारनेर तालुक्यातील या निर्णयाचे पडसात महाराष्ट्रात पडत आहेत.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख