Raleganakar's initiative: Attendance at online gram sabhas from USA, Australia | Sarkarnama

राळेगणसिद्धीचा उपक्रम : ऑनलाईन ग्रामसभेला अमेरिका, ऑस्ट्रेलियातून उपस्थिती

मार्तंड बुचुडे
मंगळवार, 16 जून 2020

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 83 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी काल रात्री ऑनलाईन ग्रामसभा घेतली.

पारनेर : अमेरिका, ऑस्ट्रेलिया व दुबईतूनही ग्रामस्थ ग्रामसभेत सहभागी होऊ शकतात, हे राळेगणसिद्धीकरांनी सिद्ध करून दाखविले. सामाजिक कार्यकर्ते सुरेश पठारे, लाभेश औटी यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन ग्रामसभेचा फंडा राळेगणसिद्धी परिवारीने राबवून राज्यालाच नव्हे, तर देशाला ग्रानसभेचा एक दिशादर्शक मार्ग दाखविला आहे. 
    
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 83 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी काल रात्री ऑनलाईन ग्रामसभा घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेले लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे ग्रामसभा घेण्यात अडचण येत होती. त्यावर उपाय म्हणून ऑनलाईन ग्रामसभेचा पर्याय पुढे आला आणि राळेगणसिद्धीकरांनी तो प्रत्यक्षात राबवून य़शस्वी करूनही दाखवला. अन तेही हजारे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून. राळेगणसिद्धी परिवार नेहमीच राज्यलाच नव्हे, तर देशाला काही तरी नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून दिशा देण्याचे काम करत असतो. ऑनलाईन ग्रामसभेची संकल्पाना सुरेश पठारे व लाभेश औटी यांनी सुचवली व त्यांनी ती तात्काळ आमलातही आणली. ऑनलाईन ग्रामसभा घेवून ती यशस्वी करूऩ दाखवली.
    
सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुळचे राळेगणसिद्धी येथील रहिवाशी व पुणे स्थीत उद्योजक भगवान पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन सभा पार पडली. प्रथम उद्योजक सुरेश पठारे यांनी प्रास्ताविक करून ग्रामसभेची रूपरेषा व संकल्पना विषद केली. त्यानंतर हजारे यांना सर्वांनी वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देऊन तसा ग्रामसभेत ठराव केला. त्यानंतर विविध विषयांना सुरूवात झाली. त्यात वाड्या- वस्त्यांसाठी सुरू असलेली नवीन पाणी योजना, शेतकऱ्यांचे कृषीविषयक प्रश्न तसेच पशु वैद्यकीय दवाखाना याबाबत येणाऱ्या अडचणी व त्या सोडविण्यासाठी काय करावे, याबाबत सविस्तर चर्चा झाली.
     
या वेळी सभेत उपस्थित लोकांनी विविध प्रश्न मांडले व चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर पि्ण्याच्या पाण्या बरोबरच शेतीच्या पाण्याच्या उपाययोजणेबाबतही चर्चा झाली. या वेळी ऑनलाईन सभेत ऑस्ट्रेलियामधून हनुमंत औटी, दुबई येथून विजय हजारे, मुंबईहून रामा पठारे, औरंगाबादहून गणेश पोटे, पुणे येथून प्रा. बी.जी. मापारी, सरपंच हिराबाई पोटे, उपसरपंच लाभेश औटी व शरद मापारी आदींनी ऑनलाईन सहभाग घेतला व चर्चा केली. यावेळी सुमारे राळेगणसिद्धी येथील 85 कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्यांनी या सभेत सहभागी नोंदविला. अध्यक्ष भगवान पठारे यांनी ऑनलाईन उपस्थितांचे आभार मानले.

विविध विषयांवर केली चर्चा

कोरोनामुळे ग्रामसभा घेता येत नव्हती. गावातील विविध प्रश्नांवर चर्चा होणे गरजेचे होते. त्यातून ऑनलाईन ग्रामसभेची संल्पना सुचली व ती आम्ही य़शस्वी करून दाखविली. यामुळे केवळ गावातीलच नव्हे, तर गावाच्या बाहेर असणारे आमचे ग्रामस्थ व नागरीकही सहभागी होऊ शकतात, हे अतीशय आनंदाची बाब आहे, असे मत सुरेश पठारे यांनी व्यक्त केले.

एक वेगळा अनुभव

हजारे यांना वाढदिवसानिमित्त काही तरी नवीन भेट द्यावयाची, हा यामागचा उद्धेश होता. राळेगणसिद्धी नेहमीच वेगळे उपक्रम राबवते. त्यातूनच हा उपक्रम राबविला. यामुळे गावातील अनेक लोक देशात व परदेशातही नोकरीनिमित्ताने आहेत, त्यांनाही या सभेत सहभागी होता आले, त्यामुळे त्यांची गावाविषयची आपुलकी व जिव्हाळा वाढणार आहे. ऑनालाईन ग्रामसभा हा एक नवीन अनुभव आहे, असे मत पुणे येथील उद्योजक भागवत पठारे यांनी व्यक्त केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख