दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी राळेगणसिद्धी ते पारनेर ट्रॅक्टर रॅली - Ralegan Siddhi to Parner tractor rally in support of farmers in Delhi | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी राळेगणसिद्धी ते पारनेर ट्रॅक्टर रॅली

एकनाथ भालेकर
मंगळवार, 26 जानेवारी 2021

राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिर ते पारनेर तहसिल कार्यालय, अशी ट्रॅक्टर तिरंगा रॅली आज सकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ झाला.

राळेगणसिद्धी : दिल्लीत शेतकऱ्यांनी जी तिरंगा रॅली काढली, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी परिवार व परिसरातील गावांनी राळेगणसिद्धी ते पारनेर अशी तिरंगा ट्रॅक्टर रॅली काढली. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी एकटे नाहीत. त्यांच्यामागे संपुर्ण देशातील शेतकरी आहेत, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सांगितले.

राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिर ते पारनेर तहसिल कार्यालय, अशी ट्रॅक्टर तिरंगा रॅली आज सकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ झाला. या वेळी हजारे बोलत होते. परिसरातील सुमारे ५० पेक्षा अधिक ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला तिरंगा झेंडे लावले होते.

या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम, अण्णा हजारे झिंदाबाद, अण्णा हजारे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अण्णा हजारे आंधी है देश के दुसरे गांधी है, शेतकरी एकजुटीचा विजय असो या घोषणांनी राळेगणसिद्धी व पारनेर तहसिल कार्यालय परिसर दुमदुमून गेला .

राळेगणसिद्धी व पंचक्रोशीतील शेतकरी ट्रॅक्टरसह आंदोलनात सहभागी झाले होते. पानोलीमार्गे पारनेर येथे फुले चौकात रॅली पोहचल्यानंतर शेतकऱ्यांनी भारत माता की जय, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांमध्ये जोश भरला. त्यानंतर पारनेर तहसिल कार्यलयासमोर रॅली पोहचली. शेतकऱ्यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.

पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, भाकपचे तालुका सचिव संतोष खोडदे, शिवसेना उपजिल्हाध्यक्ष रामदास भोसले,राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, शंकर नगरे, अंकुश गायकवाड, दादा पठारे, संदिप पठारे, दिलीप देशमुख, दत्ता आवारी, शाम पठाडे, किसन मापारी, सुभाष पठारे, नानाभाऊ मापारी, रमेश औटी, अनिल मापारी, रोहिदास पठारे, सदाशिव पठारे, गणेश भापकर, सुभाष गाजरे,  आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी या रॅलीत सहभागी झाले होते.

तीन कृषी कायदे रद्द व्हावेत, शेतीमालाला हमीभाव देणारा सुरक्षा कायदा व्हावा यासाठी दिल्लीत दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. तर हजारे यांनी स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमाला हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, यासाठी ता. ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला आहे. या दोन्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, असे माजी सरपंच जयसिंग मापारी व लाभेष औटी यांनी सांगितले.

मी अण्णांचा साथी

मी अण्णांच्या पहिल्या आंदोलनापासून सहभागी होत आलेलो आहे. अण्णांचे सर्व आंदोलने ही सामान्य जनतेसाठीच असतात. आज शेतकरी आंदोलन हा महत्त्वाचा व देशातील सर्व शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. माझे वय झाले असले, तरी मी मनाने तरुण आहे.
- रघुनाथ औटी, वयोवृद्ध शेतकरी, राळेगणसिद्धी
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख