Rajendra Pawar's school! Scientists became teachers and farmers became students | Sarkarnama

राजेंद्र पवार यांची शाळा ! शास्त्रज्ञ बनले शिक्षक अन शेतकरी झाले विद्यार्थी

वसंत सानप
मंगळवार, 2 जून 2020

राजेंद्र पवार यांच्या `मोबाईल शाळेत` शेतकरी बनले विद्यार्थी, शास्त्रज्ञ बनले शिक्षक अन तालुका क्रषी अधिकारी बनले मुख्याध्यापक ! एक ठिकाण झाले की दुसऱ्या ठिकाणी ही शाळा भरायची. दिवसभरात सहा ठिकाणी कार्यक्रम.

जामखेड : राजेंद्र पवार यांच्या `मोबाईल शाळेत` शेतकरी बनले विद्यार्थी, शास्त्रज्ञ बनले शिक्षक अन तालुका क्रषी अधिकारी बनले मुख्याध्यापक ! एक ठिकाण झाले की दुसऱ्या ठिकाणी ही शाळा भरायची. दिवसभरात सहा ठिकाणी कार्यक्रम. दररोज आठरा ते वीस गावांच्या लोकांना सलग चार दिवस सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत शिक्षणाचे धडे देत त्यांनी संपूर्ण तालुका पिंजुन काढला ! 

तालुक्यातील  शेतकऱ्यांचे  दरडोई उत्पन्न वाढावे, शेतीतील उत्पादकता वाढावी, येथील शेतीचा दर्जा उंचवावा यासाठी आमदार पवार यांच्या पुढाकाराने बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व जामखेड तालुका कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील  87 गावांत चार दिवसात  24 ठिकाणी शेतकरी मार्गदर्शन व चर्चासत्र घेण्यात आले. आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी केले.

यावर्षी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात दर्जेदार 'वाण' आपल्या शेतामध्ये पेरता यावेत, त्यांची उत्पादकता चांगली वाढावी, त्यांना चांगले पैसे मिळावेत, हाच दृष्टिकोन ठेवून गेल्या चार दिवसांपासून खरीपपूर्व पीक पेरणीपूर्व नियोजनांतर्गत अभियान राबविण्यात आले. जलसंधारणाचे महत्त्व काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व त्याद्वारे होणारे मूल्यवृद्धी याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले.

पिक विम्याचे महत्त्व

राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांना पीक विम्यापासून दर्जेदार वाणापर्यंतची माहिती दिली. पिक विमा, शेतीला असलेले संरक्षण तो नियमित भरावा,तसेच जे पीक शेतात आहे त्याचाच विमा भरावा, यामध्ये मुख्यतः होणारी चूक म्हणजे सोसायटी पेरणी केलेल्या पिकाचा पिक विमा न भरता सर्वांजण बाजरी पिकाचा विमा भरतात. ही चूक दुरुस्त करून प्रत्येकाने स्वतःच्या पेऱ्याप्रमाणे सोसायटीत नोंद करावी, त्याच पिकाची सोसायटी घ्यावी. त्याचाच पिक विमा भरावा. तसेच त्यांनी बदलती पीक पद्धतीत संबंधित पिकाचे कोरडवाहू क्षेत्रात तसेच लवकर येणाऱ्या बाजरी, तूर,उडीद ,कांदा या पिकांच्या वाणाविषयी माहिती दिली.

हे वाण पुढील वर्षी शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून देऊ. त्यामाध्यमातून त्या गावच्या शेतकऱ्यांना पुढील काळात बियाणे स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकेल. यानिमित्ताने ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे शास्त्रज्ञ विवेक भोईटे ,शास्त्रज्ञ संतोष करंजे, ओंकार ढोबळे, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींनी निरनिराळ्या पिकांच्या बाबतीत माहिती सांगितली. यानिमित्ताने तूर, बाजरी, मका, उडीद या पिकासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कांदा लागवडी संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फळबागांपैकी आंबा, लिंबू या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. चार दिवस संपूर्ण तालुका शेती क्षेत्रातील तज्ञांनी पिंजून काढला.

कृषी विभागाच्या योजनांची माहिती

तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये पांडुरंग फुंडकर कृषी योजनेंतर्गत फळबाग लागवड, एन.एच.एम.चे शेततळे, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे, फळबाग, ट्रक्टर व वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे नवीन 'स्मार्ट योजने' अंतर्गत फक्त शेतकरी गटालाच लाभ देण्यात येईल, गटशेतीचे महत्त्व समजावून  सांगितले.

गरजेनुसार मार्गदर्शन उपलब्ध करून देवू ः राजेंद्र पवार

आमदार रोहित पवार आणि तालुका कृषी विभाग यांनी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट , बारामती या संस्थेतील अधिकारी, शास्त्रज्ञानां सोबत बैठक केली आणि या भागातील शेतीची उत्पादकता वाढावी, शेतीचा दर्जा सुधारावा यासाठी खरीप पेरणीपूर्व नियोजनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल, असे चर्चासत्र घेण्याचा अग्रह धरला. त्यानुसार आम्ही हे चार दिवसांचे जामखेड तालुक्यातील चर्चासत्र राबविले. यापुढील काळात आपण येथील गरजेनुसार निरनिराळ्या फळबागांवर मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहोत, अशी ग्वाही  बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांनी दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख