जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरून राजळे - विखे संघर्ष टोकाला - Rajale-Vikhe struggle ends with District Bank elections | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरून राजळे - विखे संघर्ष टोकाला

राजेंद्र सावंत
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पाथर्डी : जिल्हासहकारी बँक निवडणुकीच्या मुद्यावरून भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे व आमदार मोनिका राजळे यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात एकसंघ वाटणाऱ्या या दिलजमाईत जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत विखे समर्थकांनी राजळे यांच्या विरोधी पवित्रा घेतल्याने `हेचि फळ काय मम तपाला` असे म्हणण्याची वेळ आता आमदार मोनिका राजळे समर्थकांवर आली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निवडणुकीत मोनिका राजळे यांनी तालुक्यातील सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताच त्यांच्या विरोधात राधाकृष्ण विखे यांचे खंदे समर्थक संभाजी वाघ यांच्या पत्नी मथुरा वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजळे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यानंतर भाजपात असलेले मात्र खासदार डॉ. सुजय विखे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनीही भटके विमुक्त मतदार संघातून, तर भाजप नगरसेविका दीपाली बंग यांनीही बिगरशेती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. हे अर्ज दाखल करताना राजळे यांना विश्वासातच न घेतल्याने राजळे यांचे समर्थक जबाजी लोंढे व भाजप महिला तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार यांनीही अभय आव्हाड यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करत विखे गटाच्या विरोधी भूमिका घेतली.

या दोघांच्याही परस्पर विरोधी भुमिकेमुळे सध्या विखे विरोधात राजळे असा संघर्ष तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभात बोलताना माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या निवडणुकीत मोनिका राजळे यांनी खूप कष्ट घेतल्यानेच सुजय विखे यांना या मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले. येथून पुढील काळात आम्ही राजळे यांना कायम साथ देऊ, अशी ग्वाही दिली होती. ही ग्वाही देताना त्यांनी काँग्रेसमधे असलेले तुमचे मामा जरी तुंमच्या पाठीशी उभे राहिले नाही, तरीही मामा म्हणून मी उभा राहील, असा चिमटाही त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना काढला होता.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे यांच्या समर्थकांनी शेवगाव तालुक्यात एक अन पाथर्डी तालुक्यात एक, अशी वेगवेगळी भूमिका घेतल्याने सध्या विखे विरुद्ध राजळे असा संघर्ष पेटला आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख