राज ठाकरेंची श्रीगोंद्यातील तरुणांच्या पाठीवर थाप  - Raj Thackeray slaps the youth of Shrigonda on the back | Politics Marathi News - Sarkarnama

राज ठाकरेंची श्रीगोंद्यातील तरुणांच्या पाठीवर थाप 

संजय आ. काटे
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

ठाकरे यांनी तरुणांचे कौतुक करीत, "चांगले काम करून दाखवा; तुमचे अनुकरण दुसऱ्यांनी केले पाहिजे, असा विकास साधा,' अशी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर टाकली.

श्रीगोंदे : तालुक्‍यातील ढोरजे व बांगर्डे या ग्रामपंचायती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात आल्या. त्याबाबतचा कार्यकर्त्यांचा जल्लोष फेसबुकवर पाहिल्यानंतर मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी या तरुणांना थेट पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्याची वेळ मिळवून दिली. त्यामुळे या नव्या पदाधिकाऱ्यांनी थेट "कृष्ण कुंज' गाठले.

ठाकरे यांनी तरुणांचे कौतुक करीत, "चांगले काम करून दाखवा; तुमचे अनुकरण दुसऱ्यांनी केले पाहिजे, असा विकास साधा,' अशी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर टाकली. 

हेही वाचा... माझे वाढलेले महत्त्व काहींना रुचले नाही ः कर्डिले

ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ढोरजे व बांगर्डे या दोन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. सरपंचांची निवड झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेसबुकवर मनसेचा झेंडा श्रीगोंद्यात फडकविल्याच्या पोस्ट शेअर केल्या. त्या शर्मिला ठाकरे यांनी पहिल्या आणि त्यांचे मोबाईल क्रमांक मिळविले. तसेच, अनपेक्षितपणे या तरुणांना थेट राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ कळविली गेली. रातोरात तरुणांनी मुंबई गाठली आणि त्यांच्या नेत्यांची भेट घेतली. 

ठाकरे यांनी त्यांना नुसती भेटच दिली नाही, तर त्यांची आस्थेवाईकपणे चौकशीही केली, तसेच ""तुमची विकासकामे पाहून हेवा वाटेल असे गाव घडवा. त्यासाठी काय लागेल ते सहकार्य करण्यासाठी पक्ष तुमच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहील,' असे सांगितले.

हेही वाचा... पिचडांना धक्का 

याचबरोबर पक्षाचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांची थेट या ग्रामपंचायतींवर मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली. या गावांच्या विकासाची "ब्लू प्रिंट' तयार करून विकासकामांचा श्रीगणेशा धुमधडाक्‍यात करा, असे ठाकरे यांनी सांगितले. 

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके, तालुकाध्यक्ष अमोल कोहक, अतुल कोठारे, अनिल वाणी, अनिल टकले, रजनीकांत कोठारे, सचिन गावडे, संदीप ठवाळ या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा...
पालिका कार्यालयासमोर  संभाजी ब्रिगेडचा ठिय्या 

श्रीगोंदे : शहरातील अनधिकृत बांधकाम काढण्यास व पारगाव रस्ता दुरुस्त करण्यास नगरपालिकेकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी, एक महिन्यात याबाबत कारवाईचे आश्‍वासन दिल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, सतीश बोरुडे यांनी दिली. 

भोस म्हणाले, ""शहराच्या हद्दीत शेतजमिनीत एका खासगी शिक्षण संस्थेच्या विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, सर्व नियम धाब्यावर बसवून झालेले आहे. पालिकेचे अधिकारी या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संबंधित अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. बाह्यवळण रस्त्यालगत अभ्यासिका व क्रीडा संकुलाच्या अतिक्रमणामुळे रस्त्याचे काम अपूर्ण असून, ते पूर्ण करण्यात यावे.'' 

महिन्याभरात मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्याधिकारी देवरे यांनी दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. 

या वेळी तालुकाध्यक्ष युवराज चिखलठाणे, सतीश बोरुडे, शहराध्यक्ष दिलीप लबडे, आजिनाथ मोतेकर, देविदास माने, युवराज पळसकर, शांताराम पोटे, संदीप कुनगर उपस्थित होते. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख