Raise the neck of the city, get two standards of cleanliness | Sarkarnama

नगर शहराची मान उंचावली, मिळाले स्वच्छतेचे दोन मानांकन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 मे 2020

ओडीएफ प्लसप्लसचा निकाल जाहीर करण्यात आला. यात नगरला 500 पैकी 500 गुण मिळाले. देशातील अडीच हजार शहरांपैकी केवळ 141 शहरांनाच ही दोन्ही मानांकने मिळविता आलेली आहेत. त्यात नगर शहराचा समावेश आहे.

नगर : स्वच्छता सर्वेक्षण मोहीम जानेवारीमध्ये राबविण्यात आली. त्यात महापालिकेने मोठ्या हिरिरीने सहभाग घेतला. कधी नव्हे ते शहर उजळून निघाले. या स्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल येण्यास सुरवात झाली आहे. काल (मंगळवारी) त्यातील कचरामुक्‍त शहर स्पर्धेचा निकाल हाती आला. आज (बुधवारी) "ओडीएफ प्लसप्लस'चा निकाल हाती आला आहे. या दोन्हींत मानांकन मिळाल्याने स्वच्छता सर्वेक्षण मधील सहा हजार पैकी 700 गुण नगर महापालिकेने मिळविले आहेत. साडेचार हजार गुणांचा निकाल येणे बाकी आहे. देशातील केवळ 141 स्थानिक स्वराज्य संस्थांनाच ही दोन्ही मानांकने मिळविता आली आहेत. नगर शहराला पहिल्यांदाच ही दोन्ही मानांकने मिळाली आहेत. 

स्वच्छता सर्वेक्षण मोहीम सुरू होण्यापूर्वी नगर शहर स्वच्छतेबाबत भारतात 200व्या क्रमांकावर होते. स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत नगर कचरामुक्‍त करण्यासाठी शहरातील सर्वांनी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्या वेळी महापालिका आयुक्‍त पदाचाही कार्यभार होता. त्यांनी या कामाला चांगला वेग दिला. महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, तत्कालीन उपायुक्‍त सुनील पवार, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेंद्रकुमार सारसर, भारत स्वच्छता अभियानाचे तत्कालीन समन्वयक सुरेश भालसिंग, प्रकल्प विभागप्रमुख राजेंद्र मेहेत्रे आदींसह महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छतेचा ध्यास घेतला होता. 

पैकीच्या पैकी गुण

नगर शहर "थ्री-स्टार' करणारच, असा निर्धार डॉ. बोरगे यांनी केला होता. काल स्वच्छता सर्वेक्षणामधील कचरामुक्‍त शहर स्पर्धेचा निकाल हाती आला. त्यात नगर महापालिकेला एक स्टार तसेच 200 गुण मिळाले आहेत. महाराष्ट्रातील 22 पैकी 11 महापालिकांनाच मानांकन मिळाले. त्यात नगर महापालिकेचा समावेश आहे. आज ओडीएफ प्लसप्लसचा निकाल जाहीर करण्यात आला. यात नगरला 500 पैकी 500 गुण मिळाले. देशातील अडीच हजार शहरांपैकी केवळ 141 शहरांनाच ही दोन्ही मानांकने मिळविता आलेली आहेत. त्यात नगर शहराचा समावेश आहे. गेल्या वर्षी नगर शहराला एकही मानांकन मिळाले नव्हते. आता स्वच्छता सर्वेक्षण, रिपोर्टिंग व नागरिकांचा सहभाग या बाबतचे निकाल जाहीर होणार आहेत. या नॉम्ससाठी साडेचार हजार गुणांचे वितरण होणार आहे. 

11 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणे शक्य

नगर महापालिकेने सहा हजार गुणांपैकी 700 गुण सध्या मिळविलेले आहेत. साडेचार हजार गुणांचा निकाल अजूनही लागणे बाकी आहे. नगर शहराला यातून किमान 11 कोटी रुपयांचे बक्षीस केंद्राकडून मिळणे अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत स्वच्छता सर्वेक्षण, रिपोर्टिंग व नागरिकांचा सहभागाबाबतच्या गुणांचे वितरण होणार आहे. त्यानंतर नगर शहर थ्रीस्टार झाल्याचे निश्‍चित होईल. 

नगरची कामगिरी काैतुकास्पद

कचरामुक्त शहर स्पर्धेत नगर शहराला एक स्टार मिळाला आहे. "ओडीएफ प्लसप्लस'चे मानांकन जाहीर होईल. भारतातील अडीच हजार शहरांपैकी केवळ 141 शहरांनाच हे मानांकन मिळविता आले आहे. त्यात नगरचा समावेश आहे. नगरकरांनी दिलेली साथ, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्यामुळेच ही काैतुकास्पद कामगिरी करता आली, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. अनिल बोरगे यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख