राहुरी तालुक्यात मंत्री प्राजक्त तनपुरे गटाचाच बोलबाला - In Rahuri taluka, the Prajakta Tanpure group dominated | Politics Marathi News - Sarkarnama

राहुरी तालुक्यात मंत्री प्राजक्त तनपुरे गटाचाच बोलबाला

विलास कुलकर्णी
सोमवार, 18 जानेवारी 2021

तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने 31 ग्रामपंचायतींवर घवघवीत यश मिळविले.

राहुरी : तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने 31 ग्रामपंचायतींवर घवघवीत यश मिळविले. भाजपने आठ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. त्यांत आमदार राधाकृष्ण विखे पाटील व कर्डिले गटाच्या प्रत्येकी चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. स्थानिक आघाड्यांच्या ताब्यात 5 ग्रामपंचायतींची सूत्रे मतदारांनी सोपविली. 

राहुरी महाविद्यालयात आज सकाळी एकाच वेळी 20 टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. एकूण नऊ फेऱ्यांमध्ये मोजणी प्रक्रिया झाली. पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीने विजय मिळविण्यास सुरवात केली. वांबोरी, उंबरे, राहुरी खुर्द, कात्रड, सात्रळ, खडांबे बुद्रुक येथे सत्तांतर झाले. काही ठिकाणी तनपुरे गटात; काही ठिकाणी विखे पाटील गटातच मैत्रीपूर्ण लढती झाल्या. काही ठिकाणी तनपुरे, विखे व कर्डिले गटांचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांच्या विरोधात उमेदवारी नाकारलेल्या नाराजांचे स्वतंत्र मंडळ होते. 

कर्डिले गटाचे भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी गणेगावात वर्चस्व राखले. रामपूर येथे रावसाहेब साबळे, गुहा येथे सुरेश वाबळे यांच्या गटाने सत्ता राखली. चेडगावात दोन उमेदवारांना समान मते मिळाली. तेथे चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवार निश्‍चित झाला. तहसीलदार फसियोद्दीन शेख, नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी निवडणूकप्रक्रिया पार पडली. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी बंदोबस्त ठेवला. 
निकाल असा : महाविकास आघाडी- तांदुळनेर, तांभेरे, वावरथ, जांभळी, खडांबे बुद्रुक, कुक्कडवेढे, वरवंडी, कात्रड, करजगाव, चांदेगाव, बोधेगाव, लाख, चेडगाव, राहुरी खुर्द, मल्हारवाडी, गुहा, पिंप्री अवघड, वळण, कुरणवाडी, केंदळ बुद्रुक, वडनेर, पिंपळगाव फुणगी (शिवसेना), आंबी, अंमळनेर, केसापूर, कोपरे/शेनवडगाव, वांजूळपोई, तिळापूर, चिंचाळे, चिंचविहिरे, वांबोरी. भाजप- सात्रळ, कणगर, गुंजाळे, वरशिंदे, संक्रापूर, दवणगाव, रामपूर, गणेगाव. स्थानिक आघाडी- कोळेवाडी, धानोरे, बाभूळगाव, उंबरे, पाथरे खुर्द.

 

हेही वाचा...

रुईगव्हाणमध्ये सत्तांतर

 
कर्जत : तालुक्‍यातील रुईगव्हाण ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. बाजार समितीचे सभापती श्रीधर पवार यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यशवंतराव जहागीरदार, शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन ग्रामविकास पॅनलने सातपैकी सहा जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले. विरोधकांना एका जागेवर समाधान मानावे लागले. 

विजयी उमेदवारांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. पवार समर्थक सचिन पवार, श्‍याम कानगुडे, नितीन धांडे उपस्थित होते. विजयी उमेदवार : अश्विनी दत्तात्रेय जामदार, रोहिणी अशोक पवार, आप्पासाहेब पवार, मालन काळे, मंगल टुळे, इंदिरा पवार. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख