अहमदनगर जिल्हा बॅंकेसाठी राहुल जगताप यांचा मार्ग सुकर - Rahul Jagtap's path is easy for Ahmednagar District Bank | Politics Marathi News - Sarkarnama

अहमदनगर जिल्हा बॅंकेसाठी राहुल जगताप यांचा मार्ग सुकर

संजय आ. काटे
मंगळवार, 26 जानेवारी 2021

पानसरे यांनी सेवा संस्था नव्हे, तर इतरत्र अर्ज दाखल केल्याने जगताप यांना बॅंकेत जाण्यासाठी एकप्रकारचा "बाय' मिळाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

श्रीगोंदे : राष्ट्रवादीचे माजी आमदार राहूल जगताप विरुध्द विद्यमान संचालक दत्तात्रेय पानसरे यांच्यात जिल्हा बॅंकेत जाण्यासाठी सेवा संस्था मतदारसंघात लढत व्हावी, यासाठी 168 मतदारांनी पाण्यात देव बुडवून ठेवले होते. मात्र त्यांचा आज हिरमोड झाला. पानसरे यांनी सेवा संस्था नव्हे, तर इतरत्र अर्ज दाखल केल्याने जगताप यांना बॅंकेत जाण्यासाठी एकप्रकारचा "बाय' मिळाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

जिल्हा बॅंकेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी श्रीगोंदे तालुक्‍यातून अनेकांनी अर्ज दाखल केले. यात प्रामुख्याने राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, दत्तात्रेय पानसरे, अर्चना पानसरे, अण्णा शेलार, प्रविण कुरुमकर, वैभव पाचपुते, भगवानराव पाचपुते यांची नावे आहेत. पानसरे यांनी सेवा संस्था मतदारसंघातून न लढता त्यांच्यासह पत्नीचे ओबीसी, बिगरशेती व महिला या मतदारसंघात अर्ज दाखल केले. अनुराधा नागवडे यांनीही महिला मतदारसंघात अर्ज दाखल केला आहे. 
दरम्यान, जगताप, राजेंद्र नागवडे, वैभव पाचपुते व प्रविण कुरुमकर यांचे अर्ज सेवा संस्था मतदारसंघातून आले असले, तरी नागवडे हे उमेदवारी करणार नसल्याचे समजते. कारण महिला मतदारसंघातून अनुराधा नागवडे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून निश्‍चित मानले जाते. 

अनुराधा नागवडे यांचीही उमेदवारी निश्‍चित? 

महिला मतदारसंघातून महाविकास आघाडीने अनुराधा नागवडे यांची उमेदवारी निश्‍चित केल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यांच्या विरुध्द भाजपाचे कोण याची नेमकी माहिती नाही. राहुल जगताप व अनुराधा नागवडे हे दोन उमेदवार महाविकास आघाडीकडून श्रीगोंद्यात निश्‍चित झाल्याने भविष्यात श्रीगोंद्यात पुन्हा एकदा नागवडे - जगताप यांची एकी दिसणार आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख