राम शिंदे यांच्या विरुद्ध पुतण्यानेच थोपटले दंड ! चाैंडीत बाजी कोण मारणार - Putanya slaps fine on Ram Shinde! Who will bet on Chandit? | Politics Marathi News - Sarkarnama

राम शिंदे यांच्या विरुद्ध पुतण्यानेच थोपटले दंड ! चाैंडीत बाजी कोण मारणार

वसंत सानप
सोमवार, 28 डिसेंबर 2020

प्रत्यक्षात उमेदवारी माघारीनंतर पॅनलचा निघणारा जाहिरनामा, पोष्टर्सवर कोणाचे नेतृत्व दर्शविणारे फोटो टाकले जातात, यावरच पक्षीय राजकारण स्पष्ट होईल. असे असले तरी निवडणूक पूर्वतयारी जोरात सुरू आहे.

जामखेड : माजीमंत्री राम शिंदे यांच्या विरुध्द त्यांचे पुतणे अक्षय शिंदे यांनी दंड थोपटल्यामुळे या वेळी चौंडी (ता. जामखेड) ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा राजकीय "कस' लागणार आहे. येथील निवडणूक पक्षपातळीवर नसून समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन दोन पॅनल समोरासमोर उतरून सरळ लढत होईल, असे चित्र दिसते. 

प्रत्यक्षात उमेदवारी माघारीनंतर पॅनलचा निघणारा जाहिरनामा, पोष्टर्सवर कोणाचे नेतृत्व दर्शविणारे फोटो टाकले जातात, यावरच पक्षीय राजकारण स्पष्ट होईल. असे असले तरी निवडणूक पूर्वतयारी जोरात सुरू आहे. 

माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला त्यांचेच पुतणे अहल्यादेवीचे वंशज अक्षय शिंदे यांनी समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आव्हान दिले आहे. त्यामुळे या वेळी चौंडीची निवडणूक बिनविरोध होणार नाही, अशी स्थिती आहे. चौंडी हे राजमाता अहल्यादेवीचे जन्मगाव; देशाच्या नकाशावर ठळकपणे ओळखले जाते. याच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राम शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली होती. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मागील वेळी माजी मंत्री शिंदे यांनी येथील निवडणूक बिनविरोध केली होती. या वेळी मात्र निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची चिन्हे दिसत नाहीत. 

माजी मंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची धुरा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष विलास जगदाळे, माजी उपसरपंच पांडुरंग उबाळे, दत्तात्रेय भांडवलकर यांच्या खांद्यावर असून, समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पॅनल तयार केले आहे. माजी मंत्री शिंदे यांचे कट्टर विरोधक व त्यांचे पुतणे अक्षय शिंदे यांनी स्थानिक राजकारणात माहिर असलेले माजी सरपंच अशोक देवकर, अविनाश शिंदे या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुनील उबाळे, गणेश उबाळे यांच्यासह समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तगडे आव्हान देण्याची तयारी केली आहे. 

चौंडीची ग्रामपंचायत प्रतिष्ठेची समजली जाते. येथून माजी मंत्री राम शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झालेली आहे. ते एकवेळा सरपंच राहिले होते. दुसऱ्या "टर्म'ला शिंदे यांचा ग्रामपंचायतीला पराभव झाला. तद्‌नंतर त्यांच्या सौभाग्यवती आशा शिंदे पंचायत समितीला जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्‍य घेऊन निवडून आल्या. सभापती झाल्या अन्‌ पुढे शिंदे आमदार झाले. त्यांना आमदार असताना येथील ग्रामपंचायतीच्या सत्तेपासून अशोक देवकर यांनी रोखले होते. सत्ता देवकरांच्या हाती होती. मात्र मंत्री असताना सर्वांच्यात मेळ घालून माजी मंत्री शिंदे यांनी निवडणूक बिनविरोध केली होती. या वेळी ही शिंदे पुन्हा बिनविरोधचा कित्ता गिरवतील, असा राजकीय अन्वयर्थ लावला जातो आहे. मात्र निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर राज्यात लक्षवेधी ठरेल. 

चौंडीच्या राजकारणात अशोक देवकर ठरणार किंगमेकर 

चौंडीच्या राजकारणात माजी सरपंच अशोक देवकार यांची भूमिका मागील पंचवीस वर्षांपासून कायम महत्वाची ठरलेली आहे. त्यांनी ठरविले, तर येथे काही ही घडू शकते, सर्वसामान्यांचा मोठा जनाधार त्यांच्या पाठिशी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शिंदे चुलत्या पुतण्यांचे लक्ष अशोक देवकर यांच्यावर केंद्रित राहते. प्रथमदर्शनी देवकर अक्षय शिंदे सोबत दिसत असले, तरी प्रत्यक्ष ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या नंतरच स्पष्ट होईल. अन्‌ निवडणूक कोणत्या वळणावर न्यायची, तेही देवकर यांच्या भूमिकेवरच अवलंबून राहणार आहे. या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.

 

Edited By  - Murlidhar karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख