अकोले : जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आयोजित सत्काराला उत्तर देताना सीताराम गायकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यामुळे गायकर लवकरच राष्ट्रवादीत जाणार, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
गायकर म्हणाले, की आपली ही शेवटची निवडणूक असून, चांगले करता आले नसेल मात्र वाईट कुणाचे केले नाही. मला सत्तेवर अजितदादा, मधुकर पिचड यांच्यामुळे संधी मिळाली. मी शरद पवारांच्या नावावर चाळीस वर्ष राजकारण केले, त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार हेच बिनविरोधचे शिल्पकार आहेत. मी त्यांचे आभार पुणे येथे जाऊन मानले.
कार्यक्रमात गायकर यांनी केवळ एकदाच माजी मंत्री पिचड यांचे नाव घेतले, मात्र माजी आमदार वैभव पिचड यांचे नाव घेतले नाही. अगस्ती पूर्ण क्षमतेने चालविला जाईल, कर्जाची चिंता करू नका. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कारखान्याचे कार्यकारी संचालक यांचे सतत नाव घेऊन त्यांनी पिचड यांचे नाव घेण्यास टाळले. त्यामुळे अजित पवार व गायकर यांची "मॅच फिक्सिंग' झाल्याचे चर्चा होत आहे.कोणत्याही क्षणी ते राष्ट्रवादीत डेरेदाखल झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्यासोबत गायकर भाजपमध्ये आले होते. जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पिचड यांना एकाकी पाडल्याची भावना निर्माण झाली असून, गायकरही राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पिचड यांना एकाकी पाडण्यासाठी होता हा "अट्टहास'
जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड यांना एकटे पाडण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व जिल्ह्यातील प्रस्थापितांनी शह देण्याची भूमिका बजावली. जिल्हा बॅंकेच्या तालुका सहकारी संस्था मतदारसंघात सीताराम गायकर यांना बळ देत त्यांना पिचड यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजकीय गणिते आखली अन् दशरथ सावंत, सुरेश गडाख यांनी उमेदवारी मागे घेतली. गायकर यांच्यावर "बिनविरोध'चे जाळे पडले. माजी आमदार वैभव पिचड यांना जाणीवपूर्वक जिल्हा बॅंकेच्या सत्तेतून दूर सारले. अकोले तालुक्याचे राजकीय चित्र व समीकरणेही आता बदलू लागली असून, अमित भांगरे यांच्या रूपाने आमदारकीच्या स्पर्धेत नवीन चेहरा आला असल्याची चर्चा आहे.
Edited By - Murlidhar Karale

