नगर : थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दंडाच्या रकमेत (शास्ती) 75 टक्के सूट देण्यात आली असून, ही सवलत केवळ चालू महिन्यातच राहणार आहे. त्यानंतर मात्र जप्तीची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. नगर महापालिकेचे सध्या 194 कोटी थकीत असून, त्यामध्ये मूळ कर 92 कोटी, तर शास्तीची रक्कम 102 कोटींची आहे. मूळ करापेक्षा दंडाचीच रक्कम जास्त आहे.
नगर शहरात करापोटी थकबाकीत असलेल्या रकमेवर 102 कोटींची दंडाची रक्कम (शास्ती) नियोजित आहे. त्यापैकी 75 टक्के म्हणजेच सुमारे 76 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोठी सवलत देऊनही थकबाकीदारांनी आपली थकबाकी भरली नाही, तर मात्र मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेच्या सभेत हा निर्णय घेतला आहे. महापालिकेची कराची थकबाकी 194 कोटी आहे. त्यामध्ये मूळ कर 92 कोटी असून, उर्वरीत 102 कोटी रुपये शास्तीचे आहेत. या शिवाय चालू मागणी 45 कोटी आहे. वसुली वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तथापि, नियमित भरणारे सहकार्य करतात, मात्र थकबाकीदार कोणतीही रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शास्तीमाफी द्यावी की नाही, याबाबत गेल्या महिनाभरापासून अधिकारी, पदाधिकारी यांच्यात चर्चा सुरू होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नियमित कर भरणारांनाही दिलासा
शास्ती माफी दिल्यानंतर नियमित कर भरणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. परंतु त्यांनाही कर भरताना 8 ते 10 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार व नियमित करदाते यांना दिलासा मिळाला आहे. शास्तीमाफी जाहीर झाल्याने आता प्रत्येक आठवड्यास आढावा घेतला जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस कारवाईबाबत नियोजन करण्यात येणार असून, याबाबत आयुक्त श्रीकांत मायकलवार निर्णय घेणार आहेत.
वसुली अधिकाऱ्यांचे फोन सुरू
दरम्यान, वसुली अधिकाऱ्यांचे थकबाकीदारांना फोन करणे सुरू झाले आहेत. महापालिकेने शास्ती माफी केली असून, आपण तातडीने उर्वरीत रक्कम भरावी, अशी विनंती केली जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडे थकबाकीदारांचा डेटा उपलब्ध आहे. त्या-त्या भागातील जबाबदारी दिलेले लोक थकबाकी भरण्याबाबत नियोजन करीत आहेत. शक्यतो दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त वसुली व्हावी, यासाठी संबंधितांचे नियोजन असल्याचे समजते.
नगरकरांनी सहकार्य करावे : महापाैर
नगरकरांसाठी शास्तीमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वसंमतीने घेतला असून, नगरकरांनी त्यासाठी सहकार्य करावे. ही सवलत केवळ नोव्हेंबरमध्येच आहे. डिसेंबरपासून मात्र संबंधित थकबाकीदारांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

