गैरव्यवहारातून नागवडे कुटुंबाने उभारले खासगी उद्योग : विरोधकांचा गंभीर आरोप - Private business set up by Nagwade family through malpractice: Serious allegations by the opposition | Politics Marathi News - Sarkarnama

गैरव्यवहारातून नागवडे कुटुंबाने उभारले खासगी उद्योग : विरोधकांचा गंभीर आरोप

संजय आ. काटे
शनिवार, 27 मार्च 2021

मळी, साखरविक्री, सहवीज निर्मिती प्रकल्प यांत मोठा भ्रष्टाचार केला. या पैशांतून त्यांच्या कुटुंबाने चार टेक्‍स्टाईल मिल आणि खासगी दोन साखर कारखाने विकत घेतले.

श्रीगोंदे : ""बापूं'नी त्यागातून उभारलेल्या कारखान्यात विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी मोठे गैरव्यवहार केले आहेत. मळी, साखरविक्री, सहवीज निर्मिती प्रकल्प यांत मोठा भ्रष्टाचार केला. या पैशांतून त्यांच्या कुटुंबाने चार टेक्‍स्टाईल मिल आणि खासगी दोन साखर कारखाने विकत घेतले,'' असा गंभीर आरोप नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल केला. 

मगर यांच्यासह साखर संघाचे संचालक घनश्‍याम शेलार, कारखान्याचे संचालक अण्णा शेलार, माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे, रावसाहेब काकडे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत नागवडे यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले. 

मगर म्हणाले, ""ऑनलाइन सभा विरोधकांचे ऐकू न येण्यासाठी "मॅनेज' केली होती. कारखान्यात अध्यक्ष नागवडे यांनी केलेला गैरव्यवहार सभेतून बाहेर न येऊ देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले; मात्र आम्ही निवडणूक प्रचारात ते पुराव्यासह मांडू. मळी, साखर, बांधकामे, सहवीज निर्मिती प्रकल्प यांत केलेल्या गैरव्यवहारांचे आकडे लाखांत नव्हे, तर कोटींमध्ये आहेत. याच पैशांतून नागवडे कुटुंबाने "परभणी' व "श्रीकांत ऍग्रो' असे दोन खासगी कारखाने घेतले. चार टेक्‍स्टाईल मिलही त्यांच्या असून, या संपत्तीची चौकशी व्हावी. कारखान्याची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नाही, कारण यांच्या ताब्यात पुन्हा कारखाना गेला, तर तो कायमचा बंद होईल.'' 

घनश्‍याम शेलार म्हणाले, ""कारखान्यात राजेंद्र नागवडे घाणेरडे राजकारण करीत आहेत. आपण साखर संघाचा संचालक असतानाही आपल्याला सभेला उपस्थित राहू न देण्यासाठी राजकारण केले गेले. आमदार, जिल्हा बॅंकेच्या संचालकांनाही सभेला येऊ दिले नाही. कारखान्याच्या विस्तारवाढीला आमचा विरोध असूनही, वाढ केवळ गैरव्यवहार करण्यासाठी आहे.'' 

बापूंच्या स्मारकातही गैरव्यवहार ः शेलार 

शिवाजीराव नागवडे यांच्या स्मारकातही राजेंद्र नागवडे यांनी भ्रष्टाचार चालविला आहे. 42 लाखांचा मुरूम दाखवीत या गैरव्यवहाराची पायाभरणी केली आहे. कारखान्यात जे लेखापरीक्षक आहेत, तेच खासगी उद्योगांत नागवडे यांचे "पार्टनर' असल्याने, कारखान्यातील गैरव्यवहार दडपण्याची खेळी ते खेळले असले तरी याप्रश्नी आम्ही त्यांना पुरून उरणार आहोत. 

विरोधकांची ही निव्वळ दिशाभूल

विरोधकांची ही निव्वळ दिशाभूल आहे. आपला दुसरा कारखाना व मिल सिद्ध करून दाखवाव्यात. "बापूं'च्या नावाने सहानुभूती घेण्याचा प्रयत्न आहे. उगीच पराचा कावळा करण्यात अर्थ नाही. ऑनलाइन सभेला घनश्‍याम शेलार यांना बोलाविले नाही, या क्षुल्लक गोष्टीचे भांडवल करण्याची गरज नाही. 
- राजेंद्र नागवडे, अध्यक्ष, नागवडे कारखाना 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख