Priority to save the people, decision regarding temples at senior level | Sarkarnama

जनतेला वाचविण्यास प्राधान्य, मंदिरांबाबत निर्णय वरिष्ठपातळीवर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 जून 2020

प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर 11 जूनपासून दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र कोरोना संकट निवारणाला राज्य सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे.

संगमनेर : ""तिरुपतीचे बालाजी मंदिर 11 जूनपासून दर्शनासाठी खुले होणार असले तरी, राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. सध्या कोरोनाच्या संकटापासून जनतेला वाचवण्यास आमची प्राधान्य आहे,'' असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, ""प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर 11 जूनपासून दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र कोरोना संकट निवारणाला राज्य सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे. आजची एकंदर परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्याबाबत विचार करून वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल.'' 

हेही वाचा...

संगमनेरमधील कोरोना हटेना

संगमनेर शहरातील चार आणि तालुक्‍यातील शेडगाव येथील एक युवक कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आल्याने तालुका हबकला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये उपचार घेत असलेल्या तीन ज्येष्ठ महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 

कोरोनाचे संक्रमण होऊन मृत्यू पावलेल्या तिन्ही महिला 5 व 6 जून रोजी बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे संगमनेर तालुक्‍यातील, कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या आठवर पोचली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाच जून रोजी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या मोमीनपुरा येथील 65 वर्षीय व नायकवाडपुरा येथील 63 वर्षीय महिलेचा, तसेच तालुक्‍यातील शेडगाव येथील, मुंबईहून आलेल्या 63 वर्षीय महिलेचा आज नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही धक्कादायक बातमी मिळाल्यानंतर काही वेळातच शहरातील मदिनानगर परिसरातील, बाधिताच्या संपर्कात आल्याने एका 23 वर्षीय महिलेला, नायकवाडपुरा भागातील बाधिताच्या संपर्कात आल्याने 35 वर्षीय तरुणाला आणि मदिनानगरमधून नव्याने 52 वर्षीय व मोमीनपुरा येथील 30 वर्षीय युवकाला कोरोनाने ग्रासल्याचा अहवाल प्राप्त झाला. संगमनेरच्या कोरोनाबाधितांची संख्या 67 झाली आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख