शनिशिंगणापूरच्या 50 कोटींच्या प्रकल्पासाठी प्राधान्य ! नूतन अध्यक्ष बानकर - Priority for Rs 50 crore project in Shanishinganapur! The new president is Bankar | Politics Marathi News - Sarkarnama

शनिशिंगणापूरच्या 50 कोटींच्या प्रकल्पासाठी प्राधान्य ! नूतन अध्यक्ष बानकर

विनायक दरंदले
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतील पानसनाला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

सोनई : "स्वयंभू शनिमूर्ती वाहून आल्याचा इतिहास असलेल्या पानसनाला नदी सुशोभीकरण काम प्रगतीपथावर असून, पन्नास कोटी रुपये खर्चाचे हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी अग्रक्रम राहिल. या कामानंतर मुक्कामी राहणाऱ्या भाविकांची संख्या निश्‍चित वाढेल, असे मत शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे नूतन अध्यक्ष भागवत बानकर यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केले. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतील पानसनाला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये या प्रकल्पाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्याच्या उद्देशाने काम पूर्ण करण्यास अग्रक्रम राहील, असे सांगून बानकर म्हणाले, की भाविकांना व ग्रामस्थांना आवश्‍यक सुविधा देत येथे येणारा भक्त समाधानाने पुन्हा पुन्हा कसा येईल, याकरीता प्रयत्न राहणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, गोशाळा, वारकरी शिक्षण, माध्यमिक विद्यालयासह विविध उपक्रम सुरू आहेत. कोरोना संसर्गाच्या निमित्ताने आठ महिने मंदिर बंद होते. कोरोना परिस्थिती निवाळत असली, तरी ट्रस्टच्यावतीने यापुढेही काळजी घेतली जाईल. कोरोना संसर्ग काळात ट्रस्टने कोवीड सेंटरच्या माध्यमातून मोठे काम केले. यापुढेही गाव व तालुकाहिताचे काम केले जाईल. 

मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व राजकीय गट एका छताखाली आले. त्यांनी पाठपुरावा केल्यानेच गावातील मुळ रहिवासीच विश्वस्त होवू शकतो, ही घटना अबाधित राहिली आहे. देवस्थान व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांत मनोमीलन झाल्याने येथे काम करणे अधिकच सोपे झाले आहे. भाविकांसाठी सुविधा, विकासकामे व ट्रस्टचे नाव उंचावणे ही त्रीसुत्री भविष्यात असणार आहे, असेही बानकर यांनी सांगितले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख