Pressure on the mayor of Jamkhed, but of which leader | Sarkarnama

जामखेडच्या नगराध्यक्षांवर राजीनाम्यासाठी दबाव ! पण कोणत्या नेत्याचा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 जून 2020

नगराध्यक्ष घायतडक यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब होत असल्याने आपण राजीनामा देत आहोत, असे घायतडक यांनी जाहीर करुन राजकीय खळबळ उडवून दिली आहे.

जामखेड : 'वाढत्या राजकीय दबावतंत्रा'चे कारण पुढे करुन जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच घायतडक यांच्याकडे दहा नगरसेवकांनी काल (शुक्रवारी) आपल्या नगरसेवकपदाचे राजीनामे दिले, असे घायतडक यांनी पत्रकार परिषद घेऊन  सांगितले. घायतडक राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. नंतर भाजपमध्ये गेले. मग त्यांच्यावर कोणत्या पक्षाच्या नेत्याचा दबाव आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

जामखेडच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून, दोन वर्षापूर्वी निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. मात्र मागील काही महिन्यांपासून जामखेड नगरपालिकेच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष घायतडक यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब होत असल्याने आपण राजीनामा देत आहोत, असे घायतडक यांनी जाहीर करुन राजकीय खळबळ उडवून दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने हाॅटस्पाॅट राहिलेले जामखेड संपूर्ण राज्यात चर्चेत राहिले. कोरोनाची धाकधूक कमी होते ना होते, तोच नगर पालिकेच्या राजकारणाची धाकधूक सुरू झाली आहे. येथे सुरू झालेले हे राजकारण नेमके कोणत्या वळणावर जाईल, हे येणारा काळ आणि वेळच ठरवेल. जामखेड नगरपालिकेत 21 नगरसेवक तसेच 2 स्वीकृत नगरसेवक आहेत. मागील साडेचार वर्षापासून निरनिराळ्या कारणांमुळे ही पालिका सतत चर्चेत राहिली. नगर पालिकेच्या स्थापनेला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून, निवडून आलेल्या नगरसेवकांना साडेचार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे . आणखी या नगरसेवकांचा सहा महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. 

साडेचार वर्षात अनेक राजकीय नाट्यमय घटना घडल्या. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली सत्ता भाजपच्या ताब्यात गेली. अखेरची 6 महिने राहिले असताना विद्यमान नगराध्यक्ष घायतडक यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून राजकीय अस्थिरता चव्हाट्यावर आणली. मात्र, प्रत्यक्ष घायतडक यांच्याकडे दहा नगरसेवकांनी सुपूर्त केलेले 'ते' राजीनामे मंजूर केल्याचे जोपर्यंत जाहीर करीत नाहीत, तसेच ते स्वतः आपल्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जामखेडच्या राजकारणात बराच 'खल' होईल. आणि या राजीनामा नाट्यावर पडदा पडेल हे मात्र निश्चित !

नगरसेवकांच्या राजीनाम्याचा राजकीय स्टंट 

घायतडक म्हणाले, की नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासंदर्भात दबावतंत्राचा आवलंब होत असल्याची माहिती आपण आपल्या सहकारी नगरसेवकांना दिली आहे. त्यानुसार माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेवक प्रिती राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गुलशन अंधारे, लता गायकवाड, सुरेखा राळेभात, सुमन राळेभात, मेहरुनिसा कुरेशी, जकीया शेख या दहा नगरसेवकांनी आपल्या नगरसेवकपदाचे राजीनामे आपल्याकडे सूपूर्त केले आहेत.  
गेल्या तीन महिन्यांपासून माझ्यावर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा म्हणून राजकीय दबाव आणला जात आहे. तसेच हा दबाव वाढत जात आसल्याने मी स्वतः जामखेड नगरपरिपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी (ता. 9) नगरपालिकेच्या बैठकीनंतर सुपूर्द करणार आहोत. तसेच दहा नगरसेवकांनी देखील आपल्या नगरसेवक पदांचा राजीनामा माझ्याकडे दिल्याचे निखिल घायतडक यांनी सांगितले आहे.

माजीमंत्री राम शिंदेंना भूमिका करावी लागणार

नगरपालिकेची सत्तेची सुत्रे माजी मंत्री राम शिंदे यांच्या हाती असून, शिंदे यांच्या अशिर्वादानेच निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. त्यामुळे सुरू झालेल्या राजीनामा नाट्यात घायतडक यांच्यासह राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांसंदर्भात माजीमंत्री राम शिंदे यांनाच आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर करावी लागेल, हे मात्र निश्चित !
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख