`तनपुरे`चे अध्यक्ष पाटील यांचा राजीनामा! आता या नेत्यांच्या व्याहीबुवांना संधी - President of 'Tanpure' resigns! Opportunity will be given to these leaders | Politics Marathi News - Sarkarnama

`तनपुरे`चे अध्यक्ष पाटील यांचा राजीनामा! आता या नेत्यांच्या व्याहीबुवांना संधी

विलास कुलकर्णी
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

अध्यक्षपदासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही ज्येष्ठ संचालक नामदेव ढोकणे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, हे मात्र गुलदस्त्यात आहे. 

राहुरी : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील व उपाध्यक्ष शामराव निमसे यांनी दिलेले पदाचे राजीनामे आज संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. येत्या दहा दिवसांत नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार असून, अध्यक्षपदासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही ज्येष्ठ संचालक नामदेव ढोकणे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, हे मात्र गुलदस्त्यात आहे. 

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली येत्या दहा दिवसात नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे. चार वर्षांपूर्वी तनपुरे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन मंडळाच्या ताब्यात कारखान्याची सूत्रे दिली. त्यावेळी आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना बंद पडला होता. उदयसिंह पाटील व शामराव निमसे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला. तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेचे कारखान्याचे थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यास मदत केली. त्यामुळे, मोठा अडसर दूर झाला. दरम्यान, जिल्हा बॅंकेने थकलेल्या कर्जाला मुदतवाढ दिली. त्यामुळे आगामी हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. 

नवीन अध्यक्षांना एकच वर्ष मिळणार

पुढील वर्षी कारखान्याची निवडणूक होणार आहे. एक वर्षासाठी नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणार आहे. कारखान्याचे सूत्रधार आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही नामदेवराव ढोकणे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते. याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख