कोरोनाच्या लढ्यात "प्रवरा पॅटर्न' लक्षवेधी

शिर्डी विधानसभा मतदारसंघात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जागतिक पातळीवर कोरोनासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजना व सुविधांचा अभ्यास केला. तज्ज्ञांच्या मदतीने एका नियोजित पद्धतीने कोरोनामुक्‍तीसाठी "प्रवरा पॅटर्न'ची आखणी केली.
Radhakrushna Vikhe
Radhakrushna Vikhe

लोणी : राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना, शिर्डी मतदारसंघात कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे "प्रवरा पॅटर्न' राज्यात लक्ष वेधत आहे. 

शिर्डी विधानसभा मतदारसंघात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जागतिक पातळीवर कोरोनासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजना व सुविधांचा अभ्यास केला. तज्ज्ञांच्या मदतीने एका नियोजित पद्धतीने कोरोनामुक्‍तीसाठी "प्रवरा पॅटर्न'ची आखणी केली. त्यात सर्वेक्षण, तपासणी व रुग्णांवर उपचार, या तीन बाबींकडे प्रामुख्याने लक्ष दिले. त्यात मतदारसंघातील 241 आशा सेविकांच्या माध्यमातून 51 हजार 665 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण केले. इन्फ्रारेड थर्मामीटर व ऑक्‍सिपल्स मीटर, तसेच सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविकांसह आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही संरक्षण किट विखे पाटील यांनी स्व-खर्चाने उपलब्ध करून दिले. त्यामुळे आठ दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण झाले. 

प्रामुख्याने नागरिकांची तपासणी करताना ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे तपासली गेली. त्यात 169 व्यक्तींना असा त्रास दिसून आल्याने, त्यांची पुढील तपासणी करण्यात आली. बाहेरगावांहून 1248 नागरिक आले, तसेच 15 फेब्रुवारीनंतर एकूण 27 व्यक्ती परदेशातून आल्या होत्या. त्यांच्यासह एकूण 4234 नागरिक बाहेरून आले होते. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अस्तगाव येथील दोघांचे नमुने निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाचे यश अधोरेखित झाले. 

प्रवरा ग्रामीण रुग्णालयातून गावाबाहेर स्वतंत्र कोविड रुग्णालयाची सुसज्ज उभारणी व कोरोना चाचणी सुविधा कार्यान्वित केल्याने, कोरोनाच्या लढ्यात प्रवरा परिवाराने केलेले कार्य जिल्ह्यात मार्गदर्शक ठरले आहे. 

नागरिकांनी सहकार्य केले ः विखे पाटील

कोरोनाच्या संकटात गावांना वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी केले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे गाव निर्जंतुकीकरण करण्यापासून ते कुटुंबांच्या आरोग्य सर्वेक्षणापर्यंत झालेल्या कामामुळेच कोरोनाचे संकट रोखण्यात यश आले. मात्र, संकटाचे सावट अद्याप कायम आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाची काळजी घेणे आवश्‍यक आहे, असे मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा...

कोरोनासाठी स्राव नमुना संकलन केंद्राची सुरवात 

संगमनेर : कोरोनाचे तातडीने निदान होण्यासाठी रुग्णाच्या घशातील स्रावाचे नमुने स्थानिक पातळीवर गोळा करण्यासाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना विषाणू नमुना संकलन केंद्राची सुरवात करण्यात आली. 

कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. संगमनेर तालुक्‍यातील कोरोना संशयित रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासण्यासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयामार्फत पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेत पाठविले जात असत. कोरोनाचे निदान करण्यासाठी, तसेच संशयित रुग्णाची प्रवासातील होणारी धावपळ टाळण्यासाठी संगमनेरातील नागरिक व डॉक्‍टरांच्या संघटनेने नमुना स्थानिक पातळीवर घेण्यासाठी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. मागील दोन महिन्यांच्या काळात हॉट स्पॉट झोन किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले व कोरोनाची पार्श्‍वभूमी नसताना कोरोनासदृश लक्षणे वाटत असणाऱ्यांसाठी ही नमुना तपासणी अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहे. ही तपासणी प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com