अजितदादांचा फोन आला, आरोग्याचे सल्ले मिळाले अन प्रशांत गायकवाड कुटुंबिय भारावले - Prashant Gaikwad's family was overwhelmed by Ajit Pawar's health advice | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांचा फोन आला, आरोग्याचे सल्ले मिळाले अन प्रशांत गायकवाड कुटुंबिय भारावले

मुरलीधर कराळे
सोमवार, 5 एप्रिल 2021

कोरोनाची बाधा झाल्यामुळे प्रशांत गायकवाड ही गेल्या आठ दिवसांपासून नगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रशांत यांच्यामुळे त्यांच्या पत्नी सोनल यांनाही कोरोनाची बाधा झाली.

नगर : पारनेर बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड तसेच त्यांच्या पत्नी सोनल या दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्याने ते सध्या नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सोमवारी सकाळी गायकवाड यांच्याशी फोनवर संपर्क साधत उभयतांच्या तब्येतीची चौकशी केली. आरोग्य तसेच आहाराबाबत सल्लेही दिले. अजित दादांनी केलेल्या चौकशीमुळे गायकवाड दांम्पत्य भारावून गेले असून, अजित दादांच्या आशीर्वादाने आम्ही लवकरच कोरोनावर मात करू, असा विश्वास प्रशांत व सोनल गायकवाड यांनी व्यक्त केला.

कोरोनाची बाधा झाल्यामुळे प्रशांत गायकवाड ही गेल्या आठ दिवसांपासून नगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रशांत यांच्यामुळे त्यांच्या पत्नी सोनल यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे दोघे एकाच रुग्णालयात एकाच खोलीत उपचार घेत असून, त्यांच्या प्रकृतीस कोणताही धोका नाही. लवकरच दोघांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यानंतर काही दिवस ते घरीच विश्रांती घेणार आहेत.

नगरच्या रूग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित दादांच्या देवगिरी बंगल्यावरून गायकवाड यांच्या मोबाईलवर फोन आला. थेट अजित दादा पवार बोलू लागल्याने गायकवाड यांना सुखद धक्का बसला. पवारांनी गायकवाड यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ऑक्सीजन लेवल काय आहे? एच आर सिटी चाचणी केली आहे का? कोणते डॉक्टर उपचार करीत आहेत, याबरोबरच कोरोणा रुग्णांनी कोणता आहार घ्यावा, कोणते उपचार करावेत, याबाबतही अजित दादांनी मार्गदर्शन केले.

सध्याचा व्हायरस मागील व्हायरस पेक्षा अधिक धोकादायक आहे, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होणार नाही, याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचा सल्लाही पवार यांनी दिला.

प्रशांत यांच्या पत्नी सोनल यांच्याशीही अजित दादांनी संभाषण केले. अजित दादांशी बोलताना सोनल यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. एखाद्या छोट्या कार्यकर्त्यांचीही अजित दादा किती आपुलकीने चौकशी करतात, याचा अनुभव आज मी घेतला. दादांच्या संभाषणामुळे आपण भारावून गेल्याचे सोनल यांनी सांगितले.

सोनल यांनाही पवार यांनी काही मौलिक सूचना केल्या. प्रशांत गायकवाड यांचे वडील कृषिभूषण सबाजीराव गायकवाड यांच्यासह संपूर्ण गायकवाड कुटुंबाचीही अजितदादांनी चौकशी केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख