"बिनविरोध'साठी माघार घेणाऱ्यांचा प्रशांत गडाख यांच्याकडून सन्मान  - Prashant Gadakh honors those who withdrew for "unopposed" | Politics Marathi News - Sarkarnama

"बिनविरोध'साठी माघार घेणाऱ्यांचा प्रशांत गडाख यांच्याकडून सन्मान 

सुनील गर्जे
बुधवार, 6 जानेवारी 2021

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी शासन, लोकसहभाग तसेच स्वतःच्या खर्चातुन गावात रचनाबद्ध विकासकामे करून दाखविली.

नेवासे : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आदर्शगाव मोरयाचिंचोरे (ता. नेवासे) गावची ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आपले उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या इच्छुकांचा सत्कार "लक्ष्मीतरू'चे वृक्षरोप व पुस्तक देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. गडाख यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

मोरयाचिंचोरे हे गाव तालुक्‍याच्या दक्षिणेला टोकाचे कायमच अवर्षणग्रस्त स्थिती असलेले आडवळणी गाव. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी शासन, लोकसहभाग तसेच स्वतःच्या खर्चातुन गावात रचनाबद्ध विकासकामे करून दाखविली. गावातील संघर्षाचे सर्वात मोठे कारण ग्रामपंचायत, सहकारी संस्थेच्या निवडणुकीत असल्याचे ओळखून गडाख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत राजकारण हे गावाच्या विकासासाठी असते, ते आपसातील हेवेदावे, सूड भावना जोपासण्यासाठी नसते, हे पटवून दिले. 

मोरयाचिंचोरे गावाची वैचारिक एकता झाल्याने गडाख यांनी "यशवंत ग्रामसंसद' ही ग्रामपंचायत सुसज्ज इमारत बांधून घेतली. गावात स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, यशवंत हॉस्पिटल, यशवंत वाचनालय उभारले. एक लाख वृक्ष लागवड व संगोपन, वनपर्यटन सुविधा केल्या. कॉंक्रीट बंधारे, बांधबंदिस्ती, सलग समतल चर, अशी जलसंधारणाची कामे केली. या उपक्रमाचे महाराष्ट्रातून स्वागत होत आहे.

प्रशांत गडाखांचा शब्द ग्रामस्थांनी पाळला 

एकदा कृतज्ञाता पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना प्रशांत गडाखांनी मोरया चिंचोरे गावाचा विकास ग्रामस्थांच्या एकजुटीने होत आहे, मात्र गावातील निवडणूक बिनविरोध होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्याबाबत ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करीत गडाख यांचा शब्द जपला. याकामी जिल्हा परिषदचे सभापती सुनील गडाख व युवा नेते उदयन गडाख यांनीही प्रयत्न केले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख