माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या हाती देवगावची सत्ता - Power of Devgaon in the hands of former MLA Murkute | Politics Marathi News - Sarkarnama

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या हाती देवगावची सत्ता

सुनील गर्जे
सोमवार, 18 जानेवारी 2021

देवगाव ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या गटाने 11 जागा जिंकून सत्ता राखली. केवळ दोन जागांवर विरोधकांना समाधान मानावे लागले.

नेवासे : देवगाव ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या गटाने 11 जागा जिंकून सत्ता राखली. केवळ दोन जागांवर विरोधकांना समाधान मानावे लागले.

मुरकुटे यांनी ग्रामपंचायत निवडणूक स्वतः हातात घेतल्याने तालुक्‍याचे लक्ष लागले होते. वाड्या-वस्त्यांसह गल्लोगल्ली फिरून त्यांनी प्रचार केला. मात्र, निवडणुकीदरम्यानच मुरकुटे यांचे कट्टर समर्थक सखाहरी आगळे, कारभारी ऊर्फ बाबा आगळे व लक्ष्मण वाल्हेकर यांच्यासह अनेकांनी गडाख गटात प्रवेश केला. त्यामुळे गावात एकहाती सत्ता टिकवून ठेवण्यात मुरकुटे यांना अपयश आले. 

विजयी उमेदवार : मुरकुटे गट- बाबासाहेब वाल्हेकर, भाऊसाहेब काळे, समिना पठाण, महेश निकम, कांताबाई तागड, मच्छिंद्र पाडळे, सुनीता गायकवाड, मुनबी शेख, लक्ष्मण भुजबळ, चांद पटेल, शालिनी काळे, गडाख गट : स्वाती काळे, मोनिका निकम. 

 

हेही वाचा..

मिरजगावात त्रिशंकू स्थिती 

कर्जत : तालुक्‍यातील मिरजगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना आघाडी विरुद्ध भाजप व मित्रपक्षांत लढत झाली. त्यात दोन्ही मंडळांना प्रत्येकी सात जागा मिळाल्या असून, अपक्ष तिघे विजयी झाले आहेत. त्यामुळे सत्तेची चावी त्यांच्या हाती गेली आहे. आघाडीचे नेते व उपसरपंच अमृत लिंगडे यांचा धक्कादायक पराभव झाला. सरपंच नितीन खेतमाळीस, त्यांच्या पत्नी सुनीता आणि डॉ. पंढरीनाथ गोरे व त्यांच्या पत्नी डॉ. शुभांगी विजयी झाल्या. 

मिरजगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. माजी सरपंच डॉ. आदिनाथ चेडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, शिवसेना नेते उपसरपंच अमृत लिंगडे, राष्ट्रवादी डॉक्‍टर्स सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोरडे, डॉ. पंढरीनाथ गोरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी झाली होती. सरपंच नितीन खेतमाळीस, बाजार समिती सदस्य लहू वतारे यांच्या गटाने त्यांना जोरदार लढत दिली. प्रभाग चारमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परमवीर पांडुळे व व्यापारी बापू कासवा यांच्या नेतृत्वाखालील नवयुग मंडळाने अपक्ष म्हणून लढत दिली. या प्रभागात तिन्ही अपक्ष विजयी झाले. दुसरीकडे, प्रमुख दोन्ही पॅनलना समसमान जागा मिळाल्याने, सत्तेची चावी अपक्षांच्या हाती आली आहे. 

विजयी उमेदवार ः नितीन खेतमाळीस, डॉ. पंढरीनाथ गोरे, त्रिवेणी फरताडे, चंद्रकांत हुमे, सुनीता खेतमाळीस, मनीषा बावडकर, संदीप बुद्धिवंत, डॉ. रजनी कोरडे, सागर पवळ, संगीता वीर पाटील, अंजूम अत्तार, लहू वतारे, संगीता कोरडे, डॉ. शुभांगी गोरे, अनिता कोल्हे, प्रकाश चेडे व उज्ज्वला घोडके. 

 

Edited by - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख