पोपटराव पवार साधणार आज खासदारांशी संवाद  - Popatrao Pawar will interact with MPs today | Politics Marathi News - Sarkarnama

पोपटराव पवार साधणार आज खासदारांशी संवाद 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

हिवरेबाजार येथील पाणी व पिकांचे नियोजन, जलसंधारण, पर्यावरण, स्वच्छता आदी क्षेत्रांतील अभ्यासपूर्ण माहिती पवार खासदारांना देणार आहेत.

नगर : गतवर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन खासदारांना देण्यात येत आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यशाळेचा प्रारंभ सोमवारी (ता. 18) झाला असून, त्याचा समारोप उद्या (ता. 22) होत आहे. त्यात राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार संवाद साधणार आहेत.

हिवरेबाजार येथील पाणी व पिकांचे नियोजन, जलसंधारण, पर्यावरण, स्वच्छता आदी क्षेत्रांतील अभ्यासपूर्ण माहिती पवार खासदारांना देणार आहेत. 

पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार हे गाव जगाच्या नकाशावर नेले. जलसंधारणाच्या कामात आदर्श निर्माण झाल्याने देशभरातील अधिकारी, ग्रामस्थ हिवरेबाजारला भेट देऊन पवार यांचे मार्गदर्शन घेतात. आता खासदारांना आपल्या कामाची माहिती ते देणार आहेत. 

 

इन्फो

देशी बियाणे जोपासा ! बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे खासदारांना आवाहन 

 

अकोले : बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांनी ऑनलाइन पद्धतीने संसदेतील खासदारांशी संवाद साधला.

"देशात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी, शेतकऱ्यांना सुखी, आनंदी ठेवण्यासाठी गावोगावी देशी बियाण्यांच्या बॅंका उभ्या राहिल्या पाहिजे. पैशांच्या बॅंका गल्लोगल्ली भेटतील; परंतु माझ्या शेतकरीराजासाठी भरवशाचे, शाश्वत बियाणे मिळण्यासाठी गावरान बियाणे वाचविण्याची चळवळ वाढविली पाहिजे. प्रत्येक गावात देशी बियाण्यांच्या बॅंका निर्माण कराव्यात,'' अशी भावनिक साद बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी खासदारांना घातली. 

राहीबाई म्हणाल्या, "गावठी आणि पारंपरिक बियाण्यांचे भाजीउत्पादन घेण्यावर भर दिला, तरच भावी पिढी सक्षम आणि सुदृढ निर्माण होईल. ग्रामीण जनतेकडे भरपूर ज्ञान आणि विद्वत्ता आहे. बायफ संस्थेने जसा माझा शोध घेतला, मला मदत केली, त्याचप्रमाणे शासनाने ग्रामीण भागातील "टॅलेंट' शोधून त्यावर काम केले पाहिजे. सामर्थ्यवान भारत निर्माण करण्यासाठी व शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे.'' 

शेवटच्या घटकापर्यंत जा 

राहीबाई म्हणाल्या, की मी माझ्या जीवनात एकमेव ध्येय ठेवले आहे, ते म्हणजे गावरान बियाणेसंवर्धन व आपल्या मातीशी इमान राखणे. सोबतच ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज या प्रश्नांनाही राहीबाईंनी अलगद हात घातला. लोकसभा सदस्यांना आपापल्या मतदारसंघांतील शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले. अनेक खासदारांनी या चर्चेत सहभाग घेतल्याची माहिती "बायफ'चे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी दिली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख