पोपटराव पवार सरपंचांचे गुरू ! कार्यालयात राष्ट्रपुरुषांच्या रांगेत मिळाले स्थान - Popatrao Pawar Sarpanch's Guru! A place in the line of national heroes in the office | Politics Marathi News - Sarkarnama

पोपटराव पवार सरपंचांचे गुरू ! कार्यालयात राष्ट्रपुरुषांच्या रांगेत मिळाले स्थान

मुरलीधर कराळे
रविवार, 6 सप्टेंबर 2020

छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, पंडित नेहरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे छायाचित्र बहुतेक सर्वच ग्रामपंचायत कार्यालयात आहेत. आता बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये पोपटराव पवार यांचेही छायाचित्र दिसून येत आहेत.

नगर : स्वतःला गावच्या विकासासाठी झोकून देणारे आदर्श सरपंच तथा महाराष्ट्राच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या कामाचा आदर्श राज्यातील सरपंच घेत आहेत. त्यामुळेच बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रपुरुषांच्या ओळीत पवार यांच्या छायाचित्राला स्थान देण्यात आले आहे.

आदर्श गाव कसं असावं, ते आदर्श कसं बनवावं, सरपंचांनी कसं काम करावं, ग्रामपंचायतचे उत्कृष्ठ कामकाज, गावची आदर्श आचारसंहिता असे अनेक आदर्श तयार करून त्याची कृती आदर्श गाव हिवरेबाजारच्या माध्यमातून पवार यांनी देशासमोर मांडली. त्यांचा आदर्श सध्या राज्यातीलच नव्हे, तर देशातील अनेक सरपंचांनी घेतला आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रपुरुषांचे छायाचित्र असतात. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, पंडित नेहरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे छायाचित्र बहुतेक सर्वच ग्रामपंचायत कार्यालयात आहेत. आता बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये पोपटराव पवार यांचेही छायाचित्र दिसून येत आहेत. आपण पवार यांच्या कार्याचा आदर्श घेऊन काम करीत असल्याचे बहुतेक सरपंच सांगतात. एव्हढेच नव्हे, तर आपल्या कार्यालयात पवार एकदा तरी येऊन जावे, असे अनेकांना वाटते. 

पवार यांनीही बहुतेक गावांना भेटी देऊन तेथील सरपंचांना व सदस्यांना मार्गदर्शन केले आहे. ग्रामपंचायतीवर निवडून आल्यानंतर आपण जनसेवक आहोत, गावाच्या हितासाठी आपण वेळ दिलाच पाहिजे. गावातील अडचणी सोडविणे, गावात विविध योजना आणणे, लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणे, ही कामे प्रत्येक सदस्यांनी, सरपंचांनी केलीच पाहिजे, या बाबींवर पवार कायम आग्रही असतात. याबरोबरच ते प्रत्येक सरपंचांना हिवरेबाजारला भेट देण्याचा आग्रह करतात. तेथे गेल्यानंतर हिवरे बाजार कसे बदलले व आपले गाव कसे बदलायला हवे, याचा मंत्र देतात. हे सर्व सरपंचांना भावते. आपणही पवार यांच्यासारखेच काम करावे, असे मनोमन वाटून सरपंच त्यांच्या आदर्शानुसार चालण्याचा प्रयत्न करतात.

पवार यांच्या कामांमुळे नगर जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये पवार यांचे छायाचित्र झळकलेले दिसून येत आहे. नगर तालुक्यातील आगडगाव ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपुरुषांचे छायाचित्र आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. तसेच सरपंच मच्छिंद कराळे यांच्या खुर्चीच्या वर पोपटराव पवार यांचे छायाचित्र लावलेले आहे. आपल्याला पवार यांचे आदर्श घेऊन काम करायचे, हे कराळे आवर्जुन सांगतात.

पोपटराव पवार हे सरपंचांचे गुरू : मच्छिंद्र कराळे

पवार हे सर्व सरपंचांचे गुरू आहेत. त्यांनी केलेले काम कोणालाही जमणार नसले, तरीही आम्ही त्यांचा आदर्श घेऊन कामे करीत आहोत. यापूर्वी त्यांना अनेकदा गावात आणून गावच्या विकासासाठी काय करता येईल, याचा मंत्र घेतला. त्यांनीही गावात फिरून काय सुधारणा करता येतील, याबाबत चर्चा केली. त्यांच्या कामाचा आदर्श अससल्याने आम्ही गावचा विकास करू शकलो. गावात पाणलोटाचे कामे त्यांच्याच मार्गदर्शनानुसार केले. गावच्या चोहूबाजुच्या डोंगरातील पाणी अडविले. आज सर्व विहिरींना पाझर चांगला आहे. शासनाच्या योजना गावात राबविण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन कामे आले. देशभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना गावात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. शहरात जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेऊन त्यांना मार्गदर्शन करणे, शहरातून येणाऱ्या लोकांची विचारपूस, गावात सॅनिटायझरचा वापर, जंतुनाशकांची फवारणी आदी सर्व उपाययोजना केल्या. पवार यांनी त्यांच्या आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये आदर्श आचारसंहिता तयार केली आहे. त्याचप्रमाणे आगडगाव येथेही तसा प्रयत्न आहे, असे आगडगावचे सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख