गुन्हेगारी विश्वातील राजकीय अभय समाजाला घातक - Political help in the criminal world is dangerous to society | Politics Marathi News - Sarkarnama

गुन्हेगारी विश्वातील राजकीय अभय समाजाला घातक

डाॅ. बाळ ज. बोठे पाटील
रविवार, 10 मे 2020

लाॅक डाऊनच्या काळात शांत झालेले गुन्हेगारी विश्व पुन्हा फुलू लागले. दारुविक्री सुरू होताच मारामारीची प्रकरणे सुरू झाली. यापुढे लाॅक डाऊन उघडताच वाळुतस्कर उभे राहतील. चोऱ्या, दरोड्याचे सत्र पुन्हा खुलू लागेल. हनी ट्रॅप सारखे प्रकार तर लाॅक डाऊन असतानाही सुरूच आहेत. याकडे पोलिस प्रशासनाने मात्र डोळेझाक करू नये.

नगर : जिल्ह्यातील गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. लाॅक डाऊनच्या काळात शांत झालेले हे विश्व पुन्हा फुलू लागले. दारुविक्री सुरू होताच मारामारीची प्रकरणे सुरू झाली. यापुढे लाॅक डाऊन उघडताच वाळु तस्कर उभे राहतील. चोऱ्या, दरोड्याचे सत्र पुन्हा खुलू लागेल. हनी ट्रॅप सारखे प्रकार तर लाॅक डाऊन असतानाही सुरूच आहेत. याकडे पोलिस प्रशासनाने मात्र डोळेझाक करू नये. विशेष म्हणजे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा इतिहास पाहिला तर राजकीय अभय मिळाल्यामुळे गुन्हेगारी बोकाळते आहे. हे समाजासाठी घातक आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन कायम प्रयत्नशील असते. तथापि, गुन्हेगारी हटत नाही. उलट वाढतच आहे. पत्नी-पत्नीचे भांडण, भाऊबंदकीतून गुन्हेगारी अशा घटना तात्कालिक असतात. एकदा असे गुन्हे घडले, की त्यातील आरोपी पुन्हा त्या वाटेने जात नाहीत. या प्रकारात नवीन प्रकरणे तयार होत असतात व पूर्वीचे कायमचे मिटून जातात. परंतु चोऱ्या, खून, दरोडे, हनी ट्रॅप, फसवेगिरी, वाळूचोरी, लॅंडमाफिया अशा प्रकारच्या गुन्हेगारी विश्वावर पोलिसांचा वचक नसला, की ते फोफावतात. या गुन्हेगारीतील एकदा पकडलेला आरोपी सुटल्यानंतर पुन्हा-पुन्हा तो गुन्हे करतो. त्यांना सुरक्षित सुटण्याची "ती साखळी' माहिती होते आणि गुन्हेगारी वाढतच जाते. त्यात पोलिस प्रशासन गुंतून राहते. त्यातून पोलिस व वकिलांचे "काम' वाढत असेल; परंतु समाजाची होणारी हानी कोण भरून काढणार, हा प्रश्न आहे. "हनी ट्रॅप'सारखे प्रकार तर काहींचे "कल्पवृक्ष' असतील; परंतु असे वृक्ष अनेक कुटुंबांना उघड्यावर पाडतात, हे लक्षात घ्यायला हवे. 

तेव्हा "त्यांची' दातखीळ का बसते? 
गुन्हेगारीचा सर्वांत जास्त फटका मध्यमवर्गीय कुटुंबीयांना बसतो. काही श्रीमंत धेंड झालेल्या नुकसानीची भरपाई कुठल्या ना कुठल्या व्यवसायातून किंवा अवैध व्यवसायातून भरून काढतात. काहींची श्रीमंतीही अवैध व्यवसायातूनच फुललेली असते. त्यामुळे ते अशा गुन्हेगारीला घाबरत नाहीत. अटक झाले, तरी जामीन घेऊन पुन्हा दुसरे "उद्योग' करण्यास मोकळे होतात. एकदा जेलची हवा खाऊन आला, की त्याची जेल किंवा पोलिसांची भीती गेलेली असते. उलट या मार्गाची त्याला माहिती होते. या मार्गावरील पळवाटा त्याला परिचयाच्या होतात. पळवाटा शोधण्यासाठी आवश्‍यक असलेले "वाटाडे' त्यांचे मित्र होतात. असे किती गुन्हेगार आहेत, की जे जेलमधून आल्यानंतर त्यांना जेलमध्ये गेल्याचा पश्‍चात्ताप होतो. खूप कमी सापडतील. उलट बाहेर पडल्यानंतर ही मंडळी कायद्याच्या चौकटीत बसेल, असे गुन्हे करतात व लीलया सुटतात. अशा वेळी निवडणुकीच्या काळात मते मागण्यासाठी येणाऱ्यांची दातखीळ बसते. उलट काही गुन्हेगारीला वाचविण्यासाठी हेच लोक पुढे येतात. खरे तर यांचेच बगलबच्चे हे गुन्हेगारी विश्वातील मोठे धेंड असतात. या सर्व गोष्टींमध्ये सर्वसामान्य कुटुंबांची राखरांगोळी होते, हेच मोठे दुर्दैव आहे. गुन्हेगारी करणारे म्होरके शाबूत बाजूला राहतात. खोड शाबूत राहते, छाटल्या जातात त्या फांद्या. खोडावर पुन्हा नवीन अंकुर फुटून त्या फांद्या दणकट होऊन पुन्हा ते गुन्हेगारीचे झाड तितक्‍याच ताकदीने नव्हे, तर नव्या जोमाने, नवीन ताकद घेऊन उभे राहते. 

त्यांनाच तर हवे असते "फळा'साठी झाड 
गुन्हेगारी फोफावण्यासाठी पोलिसांचा बेबनाव कारणीभूत असतो, हे सर्वांनाच माहिती आहे. गुन्हेगारीचे झाड मुळासकट काढणे म्हणजे पोलिस प्रशासनाला "गुन्हा' वाटतो. कारण अडचणीच्या ठरणाऱ्या केवळ फांद्याच छाटण्यात पोलिसांना स्वारस्य असते. खोड तसेच राहिले की नवीन फांद्या येऊन स्वतःसाठी "मधुर फळे' मिळतील, हे त्यांना ज्ञात आहे. हे झाड म्हणजे त्या व्यवसायातील "क्‍लायंट' असते. केव्हाही फांदी हलविली की फळे पडतात. परंतु सर्वसामान्यांसाठी सावली देण्यासाठी पानेच नसणारे हे झाड काय कामाचे? उलट ते दुसऱ्याचे संसार उन्हात, उघड्यावर पाडते. भारतावर राज्य करताना ब्रिटिशांनी ब्रिटिश नीती वापरली. भारतातील लोकांना चांगल्या शिक्षणापासून वंचित ठेवायचे. त्यामुळे त्यांच्यावर अंमल कायम ठेवता येतो. मूळ गाभा तसाच ठेवून केवळ जुजबी व कारकुनी शिक्षण देण्याचे धोरण त्यांनी धरले. अशीच काहीशी परिस्थिती गुन्हेगारीच्या बाबतीत होत आहे. मूळ व खोड शाबूत ठेवायचे. फांद्या छाटून केवळ जुजबी कारवाई करून आपला स्वार्थ साधायचा, हे पोलिस प्रशासनाचे धोरण जनतेला हानिकारक आहे. पोलिसांच्या सारख्या बदल्या होतात. काही वादग्रस्त व्यक्तिमत्त्व ठरल्यास त्याची बदली दुसऱ्या पोलिस ठाण्यात करून त्याच्यावर पडदा टाकला जातो. त्यामुळे बदलीच्या ठिकाणी असलेली गुन्हेगारी मुळापासून उखडण्यापेक्षा त्याची फळे खाऊन दुसरीकडे जाण्यात ही मंडळी धन्यता मानतात, हे कृत्य समाजाला घातक आहे. 

अनेक अधिकाऱ्यांचे काम कौतुकास्पद 
पोलिस खात्यात अनेक चांगले अधिकारी, कर्मचारी आहेत. गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्याची त्यांची मनापासून इच्छा असते. तथापि, तसे वातावरण त्यांना मिळत नाही. एखाद्या कर्मचाऱ्याला वाटले, तर अधिकारी साथ देत नाहीत आणि अधिकाऱ्यांना वाटले, तर इतर टीम चांगले काम करीत नाही. अशा काहीशा द्विधा अवस्थेत काही पोलिस मंडळी आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत जिवावर उदार होऊन अनेक मंडळी काम करीत आहेत, त्यांचे कौतुकच आहे. विश्वास नांगरे, कृष्णप्रकाश अशा अधिकाऱ्यांनी जिवाची बाजी लावून राजकीय गुन्हेगारीच्या खोडावर घाव घातला होता. त्यांचे कौतुकच करायला हवे. नगरच्या गुन्हेगारीला त्यामुळे चांगला वचक बसला. इतर पोलिस निरीक्षक व कर्मचारीही मनापासून काम करतात. कोरोनाच्या काळात तर सर्व जण घरात सुरक्षित असताना पोलिसांनी जिवाची पर्वा न करता काम केले. लोकांनीही आरोग्य कर्मचारी असतील किंवा पोलिस असतील, त्यांचे आभारच मानले. त्यामुळे काम हे गौरवास्पद आहे; मात्र काही थोड्या लोकांमुळे सर्वच पोलिस यंत्रणा बदनाम होते. एका सडक्‍या कांद्यामुळे जशी संपूर्ण चाळच सडून जाते, तसाच काहीसा प्रकार या यंत्रणेत होत आहे. अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळीच जाब विचारण्याची गरज आहे. 

नाजूक गुन्हेगारीचे कठोर हात 
"हनी ट्रॅप'सारख्या नाजूक गुन्हेगारीकडे मात्र काही अधिकाऱ्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष होते. त्यातील "लाभार्थी' असलेल्या अशा लोकांचे हात कठोर असतात. केवळ काही लोकांना वाचविण्यासाठी ही मंडळी जिवाचे रान करतात. काही अधिकारी मात्र स्वतःच त्याची शिकार झाल्याने ब्लॅकमेल होतात, हे मोठे दुर्दैव आहे. अशा प्रकरणांकडे पोलिस प्रशासनाने निष्पक्षपणे पुढे यायला पाहिजे. तपास करताना कोणत्याही आमिषाला बळी न पडता समाजातील पुढील धोके ओळखले पाहिजेत. अशा लोकांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. "हनी ट्रॅप'सारखे गुन्हे उघड झाल्यानंतर त्यात सापडलेल्या गुन्हेगारांचे संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त होते. हे लोक सापडले नाही, तर ते अनेकांचे कुटुंब उद्‌ध्वस्त करतात. त्यामुळे ही गुन्हेगारी फोफावू नये, हीच काळजी पोलिसांनी घेणे आवश्‍यक आहे. या गुन्हेगारीला आळा घालणे म्हणजे अनेक कुटुंबांचे रक्षण करणे, हे महत्त्वाचे काम पोलिसांनी निष्पक्षपातीपणे करावे, एवढीच अपेक्षा. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख