पोलिसांची अब्रु पुन्हा चव्हाट्यावर ! भ्रष्टाचाराची क्लिप व्हायरल - Police's reputation on the rise! Corruption clip goes viral | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

पोलिसांची अब्रु पुन्हा चव्हाट्यावर ! भ्रष्टाचाराची क्लिप व्हायरल

शांताराम काळे
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

गोवंशाच्या मांसची वाहतूक आणि अकोले तालुक्यातील वाळू तस्करी यात अकोल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांचा थेट संबंध दर्शविणारा धक्कादायक प्रकार एका ऑडिओ क्लिपद्वारा समोर आला आहे.

अकोले : पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मागे लागलेले जिल्हा पोलीस दलातील भ्रष्टाचाराचे शुक्लकाष्ठ काही केल्या हटण्याचे नाव घेईना. डिझेल प्रकरणापासून सुरु झालेला भ्रष्टाचाराचा हा प्रवास श्रीरामपूर, नेवासे, संगमनेर असा प्रवास करीत आता अकोले-राजूरच्या हद्दित पोहोचला आहे.

गोवंशाच्या मांसची वाहतूक आणि अकोले तालुक्यातील वाळू तस्करी यात अकोल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांचा थेट संबंध दर्शविणारा धक्कादायक प्रकार एका ऑडिओ क्लिपद्वारा समोर आला आहे.

‘सचिन शिंदे’ या खात्यातीलच ‘कलेक्टर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्याच मुखातून अकोले पोलीस ठाण्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे वर्णन पोखरलेल्या व्यवस्थेचे धिंदवडे काढणारे आहे. पोलीस दलाला बदनाम करणार्‍यांविरोधात यापूर्वीच ‘कठोर’ भूमिका जाहीर करणारे पोलीस अधीक्षक मनोज पाटील नेवाशानंतर आता अकोल्याच्या या ‘ऑडिओ बॉम्बला’ किती गांभिर्याने घेतात, याकडे अकोल्यासह जिल्हावासियांचे लक्ष्य लागले आहे. गोवंशाचे मांस आणि वाळू तस्करांशी थेट संबंध दर्शविणार्‍या दोन क्लिप एकाचवेळी व्हायरल झाल्याने जिल्हा पोलीस दलाची अब्रु पुन्हा एकदा राज्याच्या पटलावर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच अकोले पोलीस ठाण्यातील आवारात जप्त केलेल्या वाळू वाहनाचे टायर चोरी होण्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात आपल्या ‘अवैध वसुलीला’ अडसर ठरणार्‍या अकोले पोलीस ठाण्यातील सरकारी वाहनाचा चालक चंद्रकांत सदाकाळ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. यामागे अकोल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांचा हात होता, हे आता व्हायरल झालेल्या ‘त्या’ दोन्ही ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे.

पोलीस निरीक्षक जोंधळे यांच्यासाठी ‘वसुली’ करणारा पोलीस कर्मचारी कसा आपल्याच मुखातून या हप्तेखोरीत अकोले पोलीस ठाण्यातील वरीष्ठ अधिकार्‍यापासून ते पोलीस शिपाईपर्यंतचे अनेकजण लृप्त आहेत, हेच जणू ठळकपणे सांगतोय, त्यावर अकोल्यातील ‘त्या’ वाळू तस्कराने विश्वासार्हतेची मोहोरच लावली.

सदरची घटना नेमकी कधीची आहे, याचा या क्लिपमधून उलगडा होत नाही, पण घटनाक्रमावरुन गेल्या दोन-चार दिवसांतीलच ही घटना असल्याचे अगदी सुस्पष्ट आहे. कोणीतरी अज्ञाताने एका टेम्पोतून बेकायदा गोवंशाचे मांस वाहून नेले जात असल्याची तक्रार नगरच्या नियंत्रण कक्षात केली. त्यानुसार नियंत्रण कक्षातून अकोले पोलीस ठाण्याला त्याबाबत कळविण्यात आले व केलेल्या कारवाईचा अहवालही देण्यास सांगण्यास आले. कर्तव्याप्रमाणे ठाणे प्रमुखाने सरकारी वाहनाला कॉल देवून सदरची माहिती देत कारवाई करण्यास सांगितले.

त्यावेळी गस्तीवर असलेल्या सरकारी वाहनातील चालक चंद्रकांत सदाकाळसह गोराणे, खुळे व आगलावे आदी कर्मचार्‍यांनी घोटीच्या दिशेने पाठलाग करुन ‘ते’ संशयीत वाहन अडविले. त्या दारम्यान संबंधित टेम्पोच्या चालकाने अकोले पोलीस ठाण्याचा ‘वसुली’ कर्मचारी सचिन शिंदे याला फोन करुन आला, पाठलाग सुर असल्याचे सांगितले. त्या वसुली कर्मचार्‍यानेही तत्परता दाखवित थेट पोलीस निरीक्षकांनाच ही बाब कळविली. आपल्या व्यवहारात हा कोण अडथळा आणणारा, अशा अविर्भावात त्यांनी लागलीच सरकारी वाहनाचा चालक सदाकाळ याला फोन करीत त्याला चांगलेच फैलावर घेतले.

‘काऽरे.. आता तुम्ही निर्णय घेणार आहात का?’ असे म्हणत ‘उद्या काही उलट-सुलट’ झालं तर मी तुला वाचवणार नाही’ असे म्हणत धाकात घेण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या चालकाने ‘मग काय करु सर? असं विचारताच पोलीस निरीक्षक जोंधळे यांनी ‘सोडून दे ते वाहन’ असे फर्मानच सोडीत, ‘कंट्रोलला काहीच आढळून आले नसल्याचे कळविण्यासही सांगितले व दिवाळीत हे उद्योग करायचे का? असा आश्चर्यकारक प्रतिसवालही उपस्थित केला. त्यावर चालकाने होकारार्थी प्रतिसाद देत फोन बंद केला.

तर त्यांनतर काही वेळातच पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांचा ‘वसुली’ अधिकारी म्हणून परिचित असलेल्या सचिन शिंदे याने वाहनचालक सदाकाळ याला फोन केला. ‘काय रेऽ.. साहेबांचा फोन आला होता का? काय म्हणाले साहेब?’ असे प्रश्न करीत त्याने या धंद्याचे कनेक्शन कसे साहेबांपासून (अरविंद जोंधळे) खालपर्यंत पसरलेले आहे, याचे वर्णन केले. आपण कशाला उगीच डोकं लावायचं असा सल्लाही देत, तुझंही ठरवून देतो, असं सांगत त्यालाही भ्रष्टाचाराच्या कडीत सामील होण्याची खुली ‘ऑफर’ त्याने दिली.

याच संभाषणातून सचिन शिंदे सांगतो की, या गाड्यांबाबत (गोवंश मांस)  व साहेबांचे (अरविंद जोंधळे) काहीतरी बोलणे झालेले आहे, त्यामुळे आपण मध्ये नाही पडायचं. आणि दुसरी गोष्ट ‘तुम्ही तुमचं करुन घेत चला’ असा ‘मोलाचा’ सल्ला देत ‘मी त्याच्याशी (गोवंश मांस वाहतुकदार) बोलतो व तुमचेही घेतो’ असे सांगत भ्रष्टाचाराची साखळी वाढवण्याचाही प्रयत्न करतोय.

या क्लिपसोबतच वाहनचालक चंद्रकांत सदाकाळ आणि अकोले तालुक्यातील एका कथीत वाळू तस्कराचेही संभाषण व्हायरल झाले आहे. त्यातून अकोले व राजूर पोलीस दलातील कोणकोणत्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना वाळुचे हप्ते जातात, सचिन शिंदे कशा पद्धतीने नावे सांगून पैसे नेतो, याबाबत झालेल्या संभाषणाची क्लिपही व्हायरल झाली आहे.

एकाचवेळी पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी व पोलीस कर्मचारी आणि वाळु तस्कर अशा तिघांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन जिल्हा पोलीस दल पुन्हा एकदा राज्याच्या पटलावर चर्चेत आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलातील एकामागून भ्रष्टाचाराची प्रकरणं, बदल्यांच्या प्रक्रीयेत झालेला राजकीय हस्तक्षेप आणि त्याला जडलेली अर्थकारणाची किनार, उघड झाल्यानंतर मधेच थांबणारे तपास आणि पोलीस दलातील अंतर्गत हेव्यादाव्यातून चव्हाट्यावर येणारे विषय, यामुळे सहकाराची मुहूर्तमेढ रोवणार्‍या ज्येष्ठ समाजसेवक, भ्रष्टचाराविरोधात रणशंख फुंकून जागतिक पटलावर पोहोचेल्या अण्णा हजारे यांच्या जिल्ह्यात सुरु असलेले हे प्रकार निश्चितच जिल्ह्यासाठी व येथील जल्ह्यातऐतिहासिक वारशासाठी पोषक नाही. समाजसेवक अण्णा हजारे यांनीच आता जिल्ह्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभारावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

या ऑडिओ क्लिप प्रकरणापूर्वीच संबंधित पोलीस कर्मचारी चंद्रकांत सदाकाळ हा आपल्या अवैध वसुलीला अडसर ठरत असल्याच्या कारणाने पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील वाळू तस्करीच्या वाहनाचे टायर चोरी प्रकरणात त्याचे नाव गोवले व या प्रकरणात त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

‘विनाशकाले विपरित बुद्धी’ म्हणतात येथे याचा परिचय होतो. संबंधित कर्मचारी नाहक निलंबित झाल्याने त्याच्यातला प्रमाणिकपणा जागला आणि त्याने वरील संभाषणाचा क्लिप व्हायरल केल्या. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाची अब्रु पुन्हा एकदा वेशीवर आली असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भ्रष्टाचाराविरोधात आणखी कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Edited By - Murlidhar Karale 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख