राळेगणसिद्धीतील मिरवणूक पोलिसांनी थांबविली - Police stopped the victory procession in Ralegan Siddhi | Politics Marathi News - Sarkarnama

राळेगणसिद्धीतील मिरवणूक पोलिसांनी थांबविली

एकनाथ भालेकर
सोमवार, 18 जानेवारी 2021

आज निकाल जाहीर झाल्यानंतर लाभेष औटी व जयसिंग मापारी यांच्या नेतृत्त्वाखालील सर्वच्या सर्व नऊ उमेदवार एकाच पॅनलचे निवडून आले. 

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव असलेल्या राळेगणसद्धी येथे आज विजयी उमेदवारांनी विजयी मिरवणूक काढली. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ती थांबविली. 

आज दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढली. उमेदवारांना जेसीबीवर बसवून ही मिरवणूक काढण्यात आली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मिरवणूक थांबविण्यात आली. 

विजयी उमेदवारांनी घेतले अण्णांचे आशिर्वाद

ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकासाचे काम करणाऱ्यांना मतदारांनी विजयी केले. फक्त बिनविरोध निवडणूक होऊन द्यायची नाही, यासाठी विरोध करणा-यांना राळेगणसिद्धी परिवारातील लोकांनीच "तुमचं चुकतयं "  हा धडा शिकविला. हिवरेबाजारमध्येही पोपटराव पवारांच्या मोठ्या कामांमुळे ते विजयी झाले, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

ग्रामपंचायतीचा निकाल जाहिर झाल्यानंतर लाभेष औटी व जयसिंग मापारी यांच्यासह सर्व ९ विजयी उमेदवारांनी हजारे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. हजारे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

हजारे म्हणाले की, बिनविरोध निवडणुकीच्या निर्णयानंतर ग्रामविकास मंडळाच्या उमेदवार कोण कोण हे मी विचारले होते. उमेदवारांची नावे समजली. त्याच वेळी हे सर्व उमेदवार ग्रामविकासात काम करणारे असल्याने निवडून येतील, असा विश्वास आपणाला वाटत होता. फक्त बिनविरोध निवडणूक होऊन द्यायची नाही, या उद्देशाने विरोध करणारेही कोणी परके लोक नाहीत. तर ते राळेगण सिद्धी परिवारातीलच असून, थोड्याच दिवसांत तेही मतभेद विसरून ग्रामविकासाच्या कार्यात सहभागी होतील.  हे मी गेल्या ३५ - ४० वर्षांत अनुभवले आहे. हीच खरी लोकशाही आहे.

राळेगणसिद्धीची प्रेरणा घेऊन पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार मध्ये ग्रामविकासाचे मोठे काम केलेच नाही, तर राळेगणसिद्धीच्याही एक पाऊल पुढे त्यांचे काम आहे. फक्त गावासाठीच नाही, तर समाज, राज्य व देशाच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे. या कार्यामुळे ते विजयी होतील हा विश्वास होता.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख