महिलेवर अत्याचार प्रकरणी पोलिस निरीक्षक विकास वाघला अटक - Police Inspector Vikas Waghla arrested in atrocity case against woman | Politics Marathi News - Sarkarnama

महिलेवर अत्याचार प्रकरणी पोलिस निरीक्षक विकास वाघला अटक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 जून 2021

महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्याचे निलंबित पोलिस निरीक्षक विकास वाघ यांना तोफखाना पोलिसांनी नाशिक येथून मोठ्या शिताफीने अटक केली.

नगर : महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्याचे निलंबित पोलिस निरीक्षक विकास वाघ (Vikas Wagh) यांना तोफखाना पोलिसांनी नाशिक येथून मोठ्या शिताफीने अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Police Inspector Vikas Waghla arrested in atrocity case against woman)

पोलिस निरीक्षक वाघ कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असताना एका महिलेने त्यांच्यावर अत्याचारचा आरोप करून फिर्याद दिली होती. याप्रकरणी वाघ यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. वाघ यांना निलंबित करून त्यांची रवानगी नियंत्रण कक्षात करण्यात आली होती.

दरम्यान, या महिलेने पुन्हा वाघ यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात अत्याचारची फिर्याद दिली आहे.‘यापूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, यासाठी आपल्याला मारहाण केली, गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. आपल्यावर पुन्हा अत्याचार केला,’ असे या फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या तीन महिन्यांपासून वाघ पसार होते.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांना अटक करण्याचे निर्देश दिले. तोफखाना पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सूरज मेढे यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल शकील सय्यद, अविनाश वाकचौरे, सचिन जगताप यांच्या पथकाने नाशिक शहरातील भद्रकाली पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक केली.

वाघ यांची महिलेविरुद्ध तक्रार

पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी निलंबित काळात या महिलेविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. संबंधित महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

 

हेही वाचा...

खून करणारा अटकेत

नगर : दारू प्यायला पैसे न दिल्याने दिलीप देवराम विरदकर (वय ४५) यांचा खून करणारा आरोपी सोन्या बिज्जा (रा. लोंढे मळा, नगर-कल्याण रस्ता) याला कोतवाली पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक केली.

सोन्या बिज्जा याला दारूचे व्यसन आहे. तो बुधवारी (ता. १६) सायंकाळी साडेसहा वाजता नालेगावातील दारूअड्ड्यावर दारू प्यायला गेला होता. त्याने दारू पिण्यासाठी, तसेच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करू नये, या कारणावरून दिलीप विरदकर (रा. ठाणगे मळा, नालेगाव) यांच्याशी वाद घातला. लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत डोक्‍यात दगड घालून सीना नदीतील बारवेजवळ खून केला. याबाबतची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच त्यांनी अवघ्या एका तासात आरोपी सोन्या बिज्जाला अटक केली.

मृत दिलीप यांचा मुलगा राहुल (वय १९) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव दुर्गे तपास करीत आहेत. आरोपी सोन्याची प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील उपचारासाठी त्याला पुण्याला पाठविले जाणार आहे.

हेही वाचा...

नेवासे तालुक्यात मित्राकडून गोळीबार

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख