राहुरी तालुक्यात भगरीतून विषबाधा ! रुग्णांच्या मदतीला धावले मंत्री तनपुरे - Poisoning from Bhagari in Rahuri taluka! Minister Tanpure rushed to the aid of patients | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

राहुरी तालुक्यात भगरीतून विषबाधा ! रुग्णांच्या मदतीला धावले मंत्री तनपुरे

विलास कुलकर्णी
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

म्हैसगाव येथे सर्वाधिक 58 जणांना विषबाधा झाली आहे. राहुरी फॅक्‍टरी येथे सात-आठ जण, शेटेवाडी (देवळाली प्रवरा) येथे पाच जण, मुसळवाडी व गंगापूर येथे चार-पाच जणांना काल (शनिवारी) रात्री भगरीची भाकरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला.

राहुरी : तालुक्यात दळलेल्या भगरीतून विषबाधा झाल्याने अनेकांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. हा प्रकार समजताच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित गावांत धाव घेतली. ग्रामस्थांची चर्चा करून, उपचाराबाबत सूचना केल्या.

तालुका अधिकाऱ्यांचे पथक म्हैसगाव येथे आले होते. मात्र, दवाखान्यात उपचार करण्यापूर्वी कोरोनाचाचणी करावी लागेल, या भीतीने अनेक जण घरीच औषधे घेत असल्याचे समजले. 

नवरात्रानिमित्त घरोघरी महिला व पुरुषांनी नऊ दिवसांचे उपवास सुरू केले. साबुदाणा, शेंगदाणे, भगर, राजगिरा, असा माल खरेदी केला. मात्र, त्यातील दळलेली भगर उपवास करणाऱ्या भाविकांच्या जिवावर उठली. भगरीतून विषबाधा झाल्याने, तालुक्‍यातील विविध गावांतील अनेकांना जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 

या भागात जास्त रुग्ण

म्हैसगाव येथे सर्वाधिक 58 जणांना विषबाधा झाली आहे. राहुरी फॅक्‍टरी येथे सात-आठ जण, शेटेवाडी (देवळाली प्रवरा) येथे पाच जण, मुसळवाडी व गंगापूर येथे चार-पाच जणांना काल (शनिवारी) रात्री भगरीची भाकरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला. गंगापूर येथील तिघे लोणी येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. म्हैसगाव येथे काही कुटुंबांतील दोन-तीन महिलांना विषबाधा झाली आहे. 

येथून झाली विषबाधा

राहुरी फॅक्‍टरी येथील एका किराणा व्यापाऱ्याकडून ठोक दराने दळलेली भगर खरेदी करून, ग्रामीण भागातील किरकोळ किराणा दुकानदारांनी विक्री केली. भगरीतून विषबाधा झाल्याचे समजताच, किरकोळ किराणा विक्रेत्यांचे धाबे दणाणले. त्यांनी तातडीने ठोक विक्रेत्याशी संपर्क साधला. ठोक विक्रेत्याने "दळलेली भगर ग्राहकांकडून परत मागवून घ्यावी. त्यांचे पैसे परत करून, प्रकरण वाढू देऊ नका,' असा निरोप दिला.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख