पवार, थोरातांच्या इशाऱ्यावर निवडणार जिल्हा बॅंकेवर अध्यक्ष - Pawar will be elected chairman of the district bank today at the behest of Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

पवार, थोरातांच्या इशाऱ्यावर निवडणार जिल्हा बॅंकेवर अध्यक्ष

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 5 मार्च 2021

ठरल्यापेक्षा वेगळे होते, हा नगरच्या निवडणुकांचा इतिहास असल्याने, रात्रीतून होणाऱ्या वाटाघाटीच, उद्याचा गुलाल कोणावर उधळणार, हे ठरवतील. 

नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर बहुतेक कारभारी उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच इशाऱ्याने बिनविरोध निवडण्यात आले. उद्या (शनिवारी) होणारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडही "हायकमांड'च्याच आदेशाने होईल. निवडीच्या वेळी बहुतेक सूत्रे मुंबई, तसेच नगरच्या शासकीय विश्रामगृहावरून हलणार आहेत. 

जिल्हा बॅंकेच्या 21 संचालकांपैकी 17 संचालक बिनविरोध निवडून आले. उर्वरित चार जागांसाठी निवडणूक झाली. अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर नूतन संचालक मंडळ अस्तित्वात आले. आता अध्यक्ष-उपाध्यक्ष कोण होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा... स्थायीच्या सभापतीपदी अविनाश घुले

बॅंकेची निवड असली, तरी संचालक मंडळात मंत्री, आमदार असतात. जिल्ह्यातील साखर कारखान्यांना याच बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा होत असल्याने, प्रत्येक कारखानदाराचा निवडणुकीत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभाग असतो.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उद्या सकाळीच शासकीय विश्रामगृहावर येऊन थांबणार आहेत. नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी झाल्यानंतर त्यांचा थोरातांच्या हस्ते सत्कार होईल. 

हेही वाचा... घुलेंच्या शर्यतीत शेळकेंची एन्ट्री

दरम्यान, अध्यक्षपदासाठी पारनेरचे संचालक उदय शेळके किंवा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची वर्णी लागण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. उपाध्यक्षपदासाठी माधवराव कानवडे यांच्या नावाची चर्चा आहे. ठरल्यापेक्षा वेगळे होते, हा नगरच्या निवडणुकांचा इतिहास असल्याने, रात्रीतून होणाऱ्या वाटाघाटीच, उद्याचा गुलाल कोणावर उधळणार, हे ठरवतील. 

निवडीची प्रक्रिया अशी 

जिल्हा बॅंकेच्या मीटिंग हॉलमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. 6) दुपारी एक वाजता निवडीची प्रक्रिया सुरू होईल. अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जवाटप, स्वीकृती, छाननी, वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणे, माघार, अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करणे, मतदान प्रक्रिया, मतमोजणी, निकाल घोषित करणे, अशी प्रक्रिया दुपारी 2.40 पर्यंत पार पडणार आहे. उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया दुपारी 2.55 वाजता सुरू होऊन 4.25 पर्यंत चालेल. 

या संचालकांतून कोणाची लागणार वर्णी? 

शंकरराव गडाख, शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, उदय शेळके, सीताराम गायकर, अण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, माधवराव कानवडे, राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, अंबादास पिसाळ, आशुतोष काळे, अमित भांगरे, गणपतराव सांगळे, अनुराधा नागवडे, आशा तापकीर, प्रशांत गायकवाड, अमोल राळेभात, विवेक कोल्हे, करण ससाणे. 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख