Patients who have overcome corona need to donate plasma | Sarkarnama

पहा प्लाझ्मा फंडा ! बरे झालेले रुग्ण देणार कोरोनाग्रस्तांना जीवदान

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

प्लाझ्मा कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांत चांगल्या पद्धतीने मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता पुन्हा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा पाठपुरावा सुरू केला आहे.

नगर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना प्लाझ्मा थेरपीचा वापर रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. असे प्लाझ्मा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्येच चांगले मिळत आहेत. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. त्यामुळे कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण नवीन कोरोनाग्रस्तांना जीवदान देणार आहेत.

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेवून कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे असा प्लाझ्मा कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांत चांगल्या पद्धतीने मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता पुन्हा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्हाभरातील हे रुग्णांची यादी प्रसासनाकडे आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार संबंधित रुग्णांपर्यंत प्रशासन पोहचून त्याच्याकडून प्लाझ्मा घेवू शकणार आहेत.

असा मिळतो प्लाझ्मा

कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्ताचा वापर करून अॅंटीबाॅडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरियाच्या संपर्कात येते, तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रीय होते. आणि अॅंटीबाॅडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अॅंटीबाॅडीज असतात, जे आधी कोरोनाशी लढलेले असतात. जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांनी यासाठी पुढे येऊन प्लाझ्मा दान करणे आवश्यक आहे. 

केव्हा घेतात रुग्णांकडून प्लाझ्मा

कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर दहा दिवसांनंतर आणि 28 दिवसाच्या आत प्लाझ्मा दान केले पाहिजे. त्यामुळे रुग्णांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. तेथील उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी त्यांचे समुपदेशन करून याचे महत्त्व पटवून द्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पुन्हा पूर्ण लाॅकडाऊनचा धोका

दरम्यान, नगर शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिक अजूनही स्वतःची काळजी घेताना दिसत नाहीत. अजूनही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. चेहऱ्यावर मास्क घालूनच बाहेर पडावे. थोडीशीही चूक अंगलट येवू शकते. प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले आहे.

प्लाझ्माच्या निमित्ताने आता यापूर्वी बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा प्रशासनाला बोलवावेे लागणार आहे. पूर्ण बरे झालेल्या रुग्णांनी सुटकेसा निःस्वास सोडला असला, तरी कोरोनाने त्यांची पूर्णपणे पाठ सोडलेलीच नसल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे येत आहे. कोरोना रुग्णाला बरे करण्यासाठी हेच रुग्ण एकमेकांचे साह्य होणार असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख