A patient was found in Sangamner | Sarkarnama

संगमनेर कोरोनामुक्तीच्या वाटेत एक रुग्ण आडवा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 मे 2020

संगमनेरमधील संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना प्रशासनाने क्वारंटाईन करून नगरला तपासणीसाठी हलविले आहे. त्यांच्या अहवालाकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

नगर : संगमनेर तालुक्‍यातील धांदरफळ येथील सात जणांना आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले. त्यामुळे संगमनेर तालुक्याला दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे मात्र शहरातील एका व्यक्तीला ह्यदयविकारामुळे नाशिकमधील रुग्णालयात दाखल केले. तेथे तो कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्याने संगमनेरकरांची धाकधुकी वाढली आहे.

दरम्यान, संगमनेरमधील संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना प्रशासनाने क्वारंटाईन करून नगरला तपासणीसाठी हलविले आहे. त्यांच्या अहवालाकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

धांदरफळ येथील रुग्णांवर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मागील दहा दिवसांत त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. त्यांना पुढील दहा दिवस संगमनेर येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वागत करून त्यांना काल निरोप दिला. 

कोरोना विषाणूला लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 64 असून, त्यापैकी आता दहा जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून काल प्राप्त झालेल्या नऊ अहवालांपैकी पाच निगेटिव्ह आले आहेत, तर चार अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.

 धोका संपला नाही
""जिल्ह्यातील नागरिकांनीही कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक प्रयत्नांना प्रतिसाद दिला. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका संपला नाही. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. घराबाहेर पडताना चेहऱ्यास मास्क बांधावा. आवश्‍यकता असेल, तरच घराबाहेर पडावे. घरातील वृद्ध, आजारी व लहान मुलांची काळजी घ्यावी,'' असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात रुग्ण वाढत असून, शेजारील पुणे व औरंगाबाद येथेही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतिदक्षता घेतली जात आहे.

त्यांना नगरला हलविले

संगमनेर : तालुक्यातील धांदरफळ येथील सात रुग्ण आज कोरोनामुक्त झाले, परंतु शहरातील इस्लामपूरा येथील एक रुग्ण नाशिक येथील रुग्णालयात कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करून नगरला पाठविण्यात आले आहे.

संगमनेरकरांची पाठ सोडायला कोरोना तयार नसल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शहराजवळच्या धांदरफळ येथील सात रुग्ण कोरोनामुक्त होवून त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या बातमी पाठोपाठ, शहरातील इस्लामपूरा भागातील एका 70 वर्षीय रुग्णाला कोरोनाबाधीत असल्याने, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केल्याची बातमी धडकली. ही माहिती मिळताच सावध झालेल्या स्थानिक प्रशासनाने आज सायंकाळी त्या व्यक्तीच्या कुटूंबातील सात जणांना कोरोना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. 

यापूर्वी धांदरफळ आणि कुरणरोड प्रकरण, तर आता गेल्या दोन दिवसांत तालुक्यातील निमोण व चणेगाव येथील तसेच रविवारी ग्रामीण रुग्णालयातून जोर्वे नाका परिसरातील एक, अशा तीन रुग्णांच्या घसातील स्त्रावाचे नमुने जिल्हा रुग्णालयात पाठवले असून, त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. 

शहरातील इस्लामपूरा भागातील वृध्दाला 8 मे रोजी हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी त्यांचा मुलगा नाशिकच्या प्रसिध्द रुग्णालयात घेवून गेला होता. वैद्यकिय पूर्वतपासणी करताना त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमूना 11 मे रोजी पॉझिटीव्ह आल्याने, त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, तर त्यांच्यासोबत असलेल्या मुलाला तेथेच विलगीकरणात ठेवले. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र याबाबत संगमनेरच्या प्रशासनाला माहिती समजली. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित रुग्णाच्या, निकट संपर्कातील सात व्यक्तींना ताब्यात घेवून तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.

दरम्यान, संगनेरमधील अकोले बायपास या ठिकाणी असलेल्या एका कॉप्लेक्समध्ये मुंबईहून आलेल्या नऊ जणांबाबत माहिती समजल्यानंतर, त्यांना प्रशासनाने ताब्यात घेवून नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 10 दिवसांसाठी संगमनेरातील ओहरा कॉलेजमधील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या माहितीला तहसीलदार अमोल निकम यांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा...

जमिनीच्या वादातून मारामारी; बावीस जणांवर गुन्हा 

संगमनेर : अंभोरे येथे काल (रविवारी) सायंकाळी शेतजमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत झालेल्या सशस्त्र मारामारीत सहा जण जखमी झाले. याबाबत परस्परविरोधी फिर्यादींवरूसंगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील 22 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अंभोरे येथील बापू तुळशीराम खेमनर यांच्या शेतात त्यांचा चूलतबंधू ट्रॅक्‍टरवर काम करीत होता. त्या वेळी तेथे बाबूराव गवाजी खेमनर, लहानू गेणू खेमनर, धर्मनाथ पाराजी खेमनर, जालिंदर गेणू खेमनर, नंदाबाई बाबूराव खेमनर व आशाबाई धर्मनाथ खेमनर (सर्व रा. अंभोरे) आले. शेतीच्या वादातून खेमनर यांच्या चुलतभावावर कुऱ्हाड, कोयत्याने वार केले. पोलिसांनी वरील सहा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख