पंकजा मुंडे यांच्या निवडीच्या शक्यतेने `ती मावशी` हरकली - Pathardi is happy with the possibility of Pankaja Munde's selection | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडे यांच्या निवडीच्या शक्यतेने `ती मावशी` हरकली

मुरलीधर कराळे
शनिवार, 2 मे 2020

पाथर्डी तालुका आणि (कै.) गोपिनाथ मुंडे यांचे नाते अतूट होते. परळी ही आई, तर पाथर्डी ही मावशी असल्याचे मुंडे प्रत्येक भाषणातून सांगत. मावशीनेही त्यांना कधी दूर केले नाही.

नगर, ता. 2 ः महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने हिरवा कंदिल दिल्याने या जागांसाठी कोणाची वर्णी लागते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने (कै.) गोपिनाथ मुंडे ज्यांना मावशी संबोधित होते, त्या पाथर्डी शहराला आनंदच होत आहे.

पाथर्डी तालुका आणि (कै.) गोपिनाथ मुंडे यांचे नाते अतूट होते. परळी ही आई, तर पाथर्डी ही मावशी असल्याचे मुंडे प्रत्येक भाषणातून सांगत. मावशीनेही त्यांना कधी दूर केले नाही. कायम मुलासारखेच प्रेम दिले. मुंडे यांच्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनीही पाथर्डीवरील प्रेम कमी केले नाही. ग्रामविकासमंत्री असताना पाथर्डीला झुकते माप देण्याचा प्रयत्न केला.

पंकजा या बीड जिल्ह्यातील असल्या, तरी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात त्यांची अनेकदा वारी असे. मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पाथर्डीत सभा घेवून भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्यासाठी भावनिक आवाहन केले. मुंडे यांना मानणारा पाथर्डी तालुक्यात मोठा वर्ग असल्याने या आवाहनाला प्रतिसाद देत राजळे यांना चांगल्या मतांनी लोकांनी निवडून दिले. परंतु स्वतः पंकजा यांना मात्र त्यांच्या परळी मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला. राजळे यांच्या विजयोत्सवावर पंकजा मुंडे यांच्या पराभवाचीही किनार स्पष्ट जाणवत होती. त्यामुळेच निकालानंतर आमदार राजळे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल न उधळता थेट परळी गाठली. राजळे यांनी स्वतः पंकजा मुंडे यांची भेट घेवून त्यांना पाथर्डीतून उमेदवारी करण्याविषयी गळ घातली. मी राजीनामा देते, तुम्ही येथून निवडून या, असे सांगून मुंडे यांच्याविषयीचे प्रेम त्यांनी दाखवून दिले होते.

त्या मावशीला आशा निवडीची
सध्याच्या राजकीय घडामोडीत विधानपरिषदेवरील भाजपचे तीन सदस्य निवृत्त होणार आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र येथून विधानपरिषदेवर कोणाची वर्णी लागते, याबाबत उत्सुकता आहे. मराठवाड्यातून पंकजा मुंडे यांचेच नाव आघाडीवर आहे. मराठवाड्यात पंकजा यांच्यामागे मोठा जनाधार आहे, हे भाजप पक्षश्रेष्ठी जाणून आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्याची संधी भाजप सोडणार नाही, असा विश्वास पाथर्डीकरांना वाटतो. एव्हढेच नाही, तर विधान परिषदेवर निवडीनंतर मुंडे यांना विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देखील मिळू शकते. सरकारवर हल्ला चढविण्यासाठी भाजपलाही अशाच नेत्यांची गरज आहे. शिवाय राष्ट्रवादी काॅंग्रेसचे धनंजय मुंडे यांची ताकद कमी करण्याची धमक केवळ पंकजा यांच्यातच असल्याने भाजप त्यांनाच विरोधी पक्षनेतेपदाची संधी देऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली असल्याने त्यांची निवड झाल्यास पाथर्डीत पुन्हा एकदा विजयोत्सव होईल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

आम्ही वाट पाहतोय, ताईंच्या आमदारकीची ः गर्जे
पंकजाताईंची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची आम्ही वाट पाहतोय. त्या नक्की आमदार होतील, याची खात्री वाटते. पक्ष त्यांना न्याय देईलच, यात शंका नाही. त्या एका मतदारसंघाच्या नेत्या नाहीत. तर महाराष्ट्राभर त्यांचे कार्यकर्ते आहे. सर्वांनाच अपेक्षा आहे. मागील वर्षी त्यांच्या पराभवामुळे पाथर्डीत भाजपचा आमदार निवडून आलेला असतानाही आम्ही अंगावर गुलाल घेतला नाही. आमदार मोनिका राजळे यांच्यासोबत आम्ही थेट भल्या पहाटेच परळी गाठली होती. त्या वेळी आमदार राजळे व पंकजा मुंडे यांचे भावनिक नाते आम्ही अनुभवले. आता पंकजा मुंडे आमदार झाल्यास पाथर्डीकरांचा आनंद गगणात मावणार नाही, अशी प्रतिक्रिया पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्यूंजय गर्जे यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख