पाथर्डीत पालकमंत्री मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला - In Pathardi, the convoy of Guardian Minister Mushrif's vehicle was stopped | Politics Marathi News - Sarkarnama

पाथर्डीत पालकमंत्री मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

मुरलीधर कराळे
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाड्यांचा ताफा अडविला. नुकसानीची पाहणी करू नका, पंचनामे करू नका, सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.

नगर : पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडविला. पंचनामे, पाहणी करू नये, तर सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे पिके हातची गेली आहेत. मोठा खर्च करून पिकविलेली पिके अतिपाण्यामुळे पिवळी पडली. काही नष्ट झाली. काही वाहून गेले. याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ आज पाथर्डी व शेवगाव तालुक्यात गेले. पाथर्डी येथून भालगावकडे जात असताना पंचायत समितीच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविला. नुकसानीची पाहणी करू नका, पंचनामे करू नका, सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, काकासाहेब शिंदे, सुभाष केकाण आदी तसेच भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख