पारनेची शिवसेना खिळखिळी ! आता भिस्त विजय औटी यांच्या निर्णयावर - Parne's Shiv Sena squabbles, now on the decision of Bhisht Vijay Auti | Politics Marathi News - Sarkarnama

पारनेची शिवसेना खिळखिळी ! आता भिस्त विजय औटी यांच्या निर्णयावर

मुरलीधर कराळे
शनिवार, 4 जुलै 2020

आज झालेला पक्षांतर अनपेक्षित होता. तथापि, पुढे काय करायचे, काय कारवाई करायची, याबाबतचे सर्वाधिकार विजय औटी यांनाच आहेत. त्यामुळेच तेच आगामी काळात योग्य तो निर्णय घेतील.

नगर : पारनेर तालुक्यात शिवसेना खिळखिळी करण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांना यश येत आहे. नगर पंचायतीची निवडणूक अवघ्या चार महन्यांवर आली असताना शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटल्याने हा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठा धक्का आहे. नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत पुढे काय करायचे, कोणती रणणीती आखायची, याबाबतचा निर्णय आता औटी हेच घेणार आहेत. शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी याबाबतचे सर्वाधिकारी औटी यांच्याकडेच असल्याचे सांगितले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी औटी यांना धक्का देत निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. एव्हढेच नाही, तर औटी यांच्याच विरोधात दंड थोपटून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. अटीतटीची लढत होऊन लंके चांगल्या मताधिक्याने निवडून येवून आमदार झाले. औटी यांचा शिवसेनेचा बालेकिल्ला अखेर ढासळला. त्यानंतर तालुक्यातील एक-एक सत्ता ताब्यात मिळविण्यासाठी लंके यांनी प्रयत्न केले. त्याच्या विरोधात औटी यांची मात्र एकही खेळी यशस्वी झाली नाही.

आज शिवसेनेचे पाच नगरसेवक व काही कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या गळाला लागले. शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख उमा बोरुडे, नगरसेवक डाॅ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने या पाच जणांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. आगामी चार महिन्यांत नगरपंचायतीची निवडणूक आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तयारी सुरू केली होती. आज अचानक पाच नगरसेवकांनी बारामती गाठली. आणि राष्ट्रवादीची कास धरली. यावेळी आमदार लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

पारनेरमध्ये शिवसेना खिळखिळी करण्यात आमदार लंके यांना यश आले आहे. पारनेर शहरातही लंके यांनी बाजी मारली आहे. आता शिवसेनेचे नगरसेवक फोडल्यामुळे आगामी निवडणूक लंके यांना नगरपंचायतीची निवडणूकही सोपी होणार आहे. याबाबत विजय औटी आता कोणती राजकीय खेळी खेळतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. आगामी काळात लंके अजून कोणा-कोणावर गळ टाकतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ही पक्षांतराची घटना म्हणजे नगरपंचायतीच्या निवडणुकीची आखणीच समजली जाते.

चेंडू औटी यांच्याच कोर्टात : रोहोकले

शिवसेनेचे एक-एक कार्यकर्ते सोडून जात आहेत, याबाबत विचारले असता शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहोकले `सरकारनामा`शी बोलतोना म्हणाले, आज झालेला पक्षांतर अनपेक्षित होता. तथापि, पुढे काय करायचे, काय कारवाई करायची, याबाबतचे सर्वाधिकार विजय औटी यांनाच आहेत. त्यामुळेच तेच आगामी काळात योग्य तो निर्णय घेतील.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख