पारनेरच्या त्या नगरसेवकांना या कारणाने राष्ट्रवादीत घेतले, आमदार लंके यांचे यांचा दावा - Parner's corporator joined the NCP for this reason, MLA Lanka claimed | Politics Marathi News - Sarkarnama

पारनेरच्या त्या नगरसेवकांना या कारणाने राष्ट्रवादीत घेतले, आमदार लंके यांचे यांचा दावा

मुरलीधर कराळे
रविवार, 5 जुलै 2020

पारनेर नगर पंचायतीची निवडणूक तीन-चार महिन्यांवर आली आहे. असे असताना शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी काल राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे राज्यपातळीवर चर्चा झाली.

नगर : ``राज्यात शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे सरकार असताना पारनेरमधील शिवसेनेच्या त्या पाच नगरसेवकांना आम्ही राष्ट्रवादीत घेण्याचा प्रश्न येत नव्हता. परंतु त्यांच्या विनंतीवरून हा निर्णय घ्यावा लागला. ते शिवसेनेत थांबायला तयार नव्हते. पर्याय म्हणून भाजपमध्ये जाणार होते. याबाबत वरिष्ठांशी बोलूनच राष्ट्रवादीत त्यांचा प्रवेश निश्चित केला,`` असे दावा पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी `सरकारनामा`शी बोलताना केला.

पारनेर नगर पंचायतीची निवडणूक तीन-चार महिन्यांवर आली आहे. असे असताना शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी काल राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. बारामती येथे जावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे राज्यपातळीवर चर्चा झाली. राज्यात महाआघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे तीनही पक्ष एकत्र काम  करीत आहेत. असे असताना अंतर्गत फोडाफोडी करणे योग्य नाही, म्हणून दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा विषय गांभिर्याचा बनला होता. राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडतात, असा संदेश या निमित्ताने गेला. हे पाचही नगरसेवक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत आले. त्यामुळे या सर्व घडामोडींना आमदार लंके जबाबदारी आहेत का, असा सूर राज्यपातळीवर सुरू झाला. त्याविषयी लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना माहिती दिली.

आमदार लंके म्हणाले, की

हे नगरसेवक मागील काही दिवसांपासून आपल्याशी संपर्क करून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये येण्याचा प्रयत्न करीत होते. तथापि, मी त्यांना समजावून सांगितले. तुम्ही राष्ट्रवादीत येण्यापेक्षा आम्ही ताकद देतो. तुमचा पाण्याचा प्रश्न सोडविता. तुम्ही इकडे येणे ठिक नाही. परंतु शिवसेनेत आपले पटत नाही. राष्ट्रवादीही आपल्याला पदरात घेत नाही. या सर्व परिस्थितीत आपल्याला कोणीतरी नेता असावा म्हणून ते भाजपकडे गेले. तेथे त्यांचा पक्षप्रवेशही ठरला. ते पुन्हा माझ्याकडे आले. अखेरची विनंती केली. हे सर्व अजित पवार यांना सांगितले. पवार यांनी स्पष्ट सांगितले, की शिवसेनेच्या कोणालाही राष्ट्रवादीत घ्यायचे नाही. सरकार दोन्ही पक्षाचे असताना असे करता येणार नाही. याबाबत पवार यांनी त्या पाचही जणांना बोलावून घेतले. त्यांना समजावून सांगितले. परंतु त्या नगरसेवकांनी सांगितले, की आम्हाला शिवसेनेचे नेतृत्त्व मान्य नाही. तुम्ही आम्हाला राष्ट्रवादीत घेतले नाही, तर आम्ही भाजपमध्ये जावू. हे सर्व ऐकून अखेर त्यांना पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. 

पारनेर नगर पंचायतीची निवडणूक आगामी तीन-चार महिन्यांवर आली आहे. या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतले नसते, तर ही पंचायत भाजपच्या ताब्यात जावू शकेल, अशी शक्यता निर्माण झाली असती. त्यामुळे विरोधी पक्षाकडे जाण्यापेक्षा महाआघाडी सरकारच्या ताब्यात राहू शकेल, त्यानुसार हा निर्णय झाला आहे. वरिष्ठांनी सांगितल्यानंतरच त्यांचा पक्षप्रवेश ठरला. त्यामुळे याबाबत कोणीही गैरसमज करून घेवू नये. राज्यात महाआघाडी सरकारमध्ये दोन्ही पक्ष अत्यंत चांगले काम करीत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंत्री, आमदार चांगले काम करीत आहेत. असे असताना या प्रवेशाची चर्चा होणे स्वाभाविकच आहे. तथापि, पारनेर नगर पंचायत विरोधकांकडे जावू नये, हीच यामागची भूमीका होती, असे आमदार लंके यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही नदीतून गेलेले पाणी अखेर समुद्रालाच

शिवसेनेत असले, काय अन राष्ट्रवादीत असले काय एकच आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे हे समुद्र आहेत. कोणत्याही नदीला पाणी गेले, तरी ते अखेर समुद्रातच जाणार आहे. त्यामुळे एकमेकांत पक्षप्रवेश हे योग्य नसले, तरीही भाजपची ताकद वाढू नये, यासाठी हा निर्णय घ्यावा लागला, असे आमदार लंके यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख