पारनेर पोलिस ठाण्याच्या हवालदारास पाच हजाराची लाच घेताना पकडले ! - Parner police constable caught taking bribe of Rs 5,000 | Politics Marathi News - Sarkarnama

पारनेर पोलिस ठाण्याच्या हवालदारास पाच हजाराची लाच घेताना पकडले !

मार्तंड बुचुडे
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

पत्नीने केलेल्या तक्रारीवरून कारवाई टाळण्यासाठी पारनेर पोलीस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी नगरच्या लाचलुचपतच्या पथकाने आज दुपारी अटक केली

पारनेर : पत्नीने केलेल्या तक्रारीवरून कारवाई टाळण्यासाठी पारनेर पोलीस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी नगरच्या लाचलुचपतच्या पथकाने आज दुपारी अटक केली.

शंकर रोकडे ( वय 30) असे या हवालदाराचे नाव आहे. क्रॉस फिर्याद दाखल करणे व पत्नीने केलेल्या फिर्यादीत तहसीलदार यांच्यासमोर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पाठविणे, यासाठी तक्रारदारकडून पाच हजार रूपयांची मागणी केली होती. तालुक्यातील देवीभोयरे फाटा येथील रहिवाशी असलेल्या तक्रारदाराला रोकडे यांनी आठ दिवसांपूर्वी फोन करून संबंधिताच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. संबंधिताने याबाबत लोकजागृती सामाजिक संस्थेला ही माहिती दिली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अशी तक्रार देऊन सापळा रचण्यात आला. त्यानुसार रोकडे यांना लाचलुचत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली आहे. 

 

हेही वाचा..

राखीव प्रवर्गात महिलेऐवजी पुरुषही सरपंचपदासाठी पात्र 

पारनेर : राखीव प्रवर्गातील सदस्य नसल्यास त्याच प्रवर्गातील महिलेऐवजी पुरुष किंवा पुरुषाऐवजी महिला सरपंच होऊ शकेल. या निर्णयामुळे वडझिरे व वाघुंडे येथील सरपंचपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, भोयरे गांगर्डा येथील तिढा कायम आहे. 

तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींपैकी मंगळवारी (ता. 9) 52 आणि बुधवारी (ता. 10) 36 ठिकाणी सरपंचांची निवड होणार आहे. त्यासाठी सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. मात्र, वडझिरे, वाघुंडे बुद्रुक व भोयरे गांगर्डा येथे आरक्षित प्रवर्गाचा सदस्य नसल्याने सरपंचपदाचा तिढा निर्माण झाला होता. नव्या निर्णयानुसार, सरपंचपदासाठी राखीव प्रवर्गातील सदस्य नसल्यास, त्याच प्रवर्गातील महिलेऐवजी पुरुष वा पुरुषाऐवजी महिला सरपंच होऊ शकेल. त्यामुळे वडझिरे व वाघुंडे येथील सरपंचपदांचा मार्ग मोकळा झाला. 

भोयरे गांगर्डा येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी सरपंचपद राखीव आहे. मात्र, या प्रवर्गातील एकही सदस्य नसल्याने येथील तिढा कायम आहे. 
वडझिरे येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला सदस्य नसल्याने तेथे पुरुष सदस्य सरपंच होऊ शकेल. वाघुंडे बुद्रुक येथे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील महिला सदस्य नसल्याने तेथेही त्याच प्रवर्गातील पुरुष सरपंच होऊ शकेल, असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. 

दरम्यान, राखीव प्रवर्गातील सदस्यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर जातपडताळणी वा पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेला असणे गरजेचे आहे. पडताळणीची पावती दाखवावी लागेल. राखीव प्रवर्गातील सदस्य सरपंच निवडीच्या वेळी गैरहजर राहिल्यास, त्याच प्रवर्गातील स्त्रीऐवजी पुरुष वा पुरुषाऐवजी महिला सरपंचपदासाठी अर्ज करू शकेल. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख