नगर : स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून देत ग्रामीण विकास, नागरीकरण, आधुनिक तंत्रज्ञानासह भारताच्या विकासाचा पाया घातला असल्याने ते हे खरे आधुनिक भारताचे शिल्पकार ठरले असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
यशोधन संपर्क कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रा. बाबा खरात, राजेंद्र आव्हाड, शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारक व राष्ट्रपुरुषांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या त्यागातून बलिदानातून भारताला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. समृद्ध लोकशाही असणारा जगाच्या पाठीवरील भारत हा एकमेव देश असून भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण करतांना त्यांनी विज्ञान व औद्योगीकरणातून विकासाचा पाया घातला. नगरच्या तुरुंगामध्ये `डिस्कव्हरी ऑफ इंडिया` हा ग्रंथ लिहिणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून, लहुजी साळवे यांचे ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान मौल्यवान आहे, या दोन्हीही भारतमातेच्या पुत्रांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.
पंडीत नेहरु यांच्या नगरमधील आठवणी सांगत थोरात यांनी नगरच्या भुईकोट किल्ल्यात नेहरु यांच्या वास्तव्याबाबतची माहिती विषद केली. नेहरू तसेच इतर नेते नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदिवासात असताना त्यांनी तुरुंगात राहूनही अनमोल काम केले आहे. देशाला दिशा देणाऱ्या ग्रंथांची निर्मिती केली, असल्याचे थोरात यांनी सांगितले.

