पाचपुतेंना आठवले 2012 मधील `ते` दिवस ! म्हणाले, `मला विरोध केल्याचा हा घ्या परिणाम` - Pachpute remembers `those` days in 2012! He said, "Take this as a result of opposing me." | Politics Marathi News - Sarkarnama

पाचपुतेंना आठवले 2012 मधील `ते` दिवस ! म्हणाले, `मला विरोध केल्याचा हा घ्या परिणाम`

मुरलीधर कराळे
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

नगर : पाथर्डी तालुक्यात बिबट्याने तीन जणांचा बळी घेतल्यानंतर त्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याला पकडून जंगलात सोडावे, असेच सर्वांचे म्हणणे आहे. त्याचा संदर्भ देत आमदार बबनराव पाचपुते यांना 2012 मधील दिवस आठवले. बिबट्या रेस्क्यु प्रकल्प त्यांनी प्रस्तावित केला होता. त्या वेळी इतर नेत्यांनी त्यांना विरोध केला. त्याचा परिणाम बिबट्याचे वाढते हल्ले होत असल्याचे सांगून त्यांनी त्या विरोधाचा वचपा काढला.

नगर : पाथर्डी तालुक्यात बिबट्याने तीन जणांचा बळी घेतल्यानंतर त्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याला पकडून जंगलात सोडावे, असेच सर्वांचे म्हणणे आहे. त्याचा संदर्भ देत आमदार बबनराव पाचपुते यांना 2012 मधील दिवस आठवले. `बिबट्या रेस्क्यु प्रकल्प` त्यांनी प्रस्तावित केला होता. त्या वेळी इतर नेत्यांनी त्यांना विरोध केला. त्याचा परिणाम बिबट्याचे वाढते हल्ले होत असल्याचे सांगून त्यांनी त्या विरोधाचा वचपा काढला.

भाजपच्या बैठकिस भाजपचे नेते आज नगरला आले होते. या वेळी माध्यमाशी बोलताना पाचपुते यांना ते दिवस आठवले. 2012 मध्ये पाचपुते वनमंत्री होते. त्यांनी बेलवंडी (ता. श्रीगोंदे) येथे रेस्क्यु सेंटर प्रस्तावित केले होते. पण त्या वेळी राजकारणाचा भाग म्हणून इतर नेत्यांनी त्या प्रकल्पास विरोध केला होता. त्यामुळे हा प्रकल्प बारगळला. त्याचा संदर्भ देऊन पाचपुते म्हणाले, की सध्या बिबट्याचे होत असलेल्या हल्ल्याला त्या वेळी विरोध करणारे नेतेच जबाबदार आहेत. जिल्ह्यात बिबट्याची मोठी समस्या आहे. बहुतेक ठिकाणी असलेल्या ऊसाच्या शेतात बिबट्याला लपण्यास जागा आहेत. निसर्गातील त्याचे अन्न कमी होत असल्याने ते मानवी वस्तीकडे धाव घेतात. कुत्रा, शेळी, मेंढी, गाय आदींवर हल्ले करतात. याच दरम्यान लहान मुले त्याच्या टप्प्यात आल्यास त्यांना उचलून नेतात. यावर उपाय शोधला पाहिजे. जिल्ह्यात रेस्क्यु सेंटर, बिबट्या सफारीसारखे प्रकल्प राबवून त्यांना पकडून जंगलात सोडले पाहिजे. ही समस्या गंभीर आहे. त्याबाबत गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे पाचपुते यांनी सांगितले.

दरम्यान, पाचपुते वनमंत्री असताना त्यांनी वन्य प्राण्यांबाबत अऩेक निर्णय घेतले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निर्णय घेतले. वन्य प्राण्यांपैकी हिंस्त्र पशुंचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. वनमंत्री असताना बिबटे पकडण्याची मोहीम वेगात राबविली होती. अकोले तालुक्यात बिबट्याचा उपद्रव जास्त असतो. तेथील बिबटे पकडून इतरत्र हलविले होते. 

पाथर्डी तालुक्यात नुकत्याच एकापाठोपाठ तीन घटना घडल्या. लहान मुलांना उचलून बिबट्याने त्यांचा बळी घेतला. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात वनविभाग यशस्वी झाले असले, तरी अजूनही अनेक बिबटे आहेत, की जे मनुष्यावरही हल्ले करीत आहेत. असा नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करायलाच हवा. त्याचबरोबर हरिण, ससे आदी वन्य प्राण्यांची शिकार रोखण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे जंगलातील संतुलन बिघडणार नाही, असे मत राजकीय नेत्यांनी व्यक्त केले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख