नगरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा ! काळाबाजार होत असल्याची डाॅक्टरांची तक्रार - Oxygen shortage in the city! Doctors complain of black market | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा ! काळाबाजार होत असल्याची डाॅक्टरांची तक्रार

मुरलीधर कराळे
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

इंडियन मेडिकल असोशिएशन (इमा) ही डाॅक्टरांची संघटना आहे. काल (ता. 10) संघटनेने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये ऑक्सिजनचा काळाबाजार, व्यापाऱ्यांकडून दरवाढ, पुरवठा कमी अशा अनेक अडचणी मांडल्या आहेत.

नगर : कोरोना रुग्ण वाढत असल्याने नगर जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणीही तब्बल चाैपट झाली आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा मात्र व्यवस्थित होत नाही. त्यातही व्यापाऱ्यांकडून काळाबाजार होत असल्याचे इंडियन मेडिकल असोशिएशनने पत्राद्वारे उघड केले आहे. यापुढे कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावल्यास त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहिल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

इंडियन मेडिकल असोशिएशन (इमा) ही डाॅक्टरांची संघटना आहे. काल (ता. 10) संघटनेने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये ऑक्सिजनचा काळाबाजार, व्यापाऱ्यांकडून दरवाढ, पुरवठा कमी अशा अनेक अडचणी मांडल्या आहेत. एव्हढेच नव्हे, तर आगामी काळात केवळ ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्यास त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डाॅ. अनिल आठरे, सचिव डाॅ. सचिन वहाडणे यांच्या सह्या आहेत. 

निवेदनात म्हटले आहे, की सध्या कोरोना महामारीच्या संकटकाळात अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी चाैपट वाढलेली आहे. परंतु ऑक्सिजनची वितरण व्यवस्था अतिशय कमी पडत असून, वेळोवेळी ऑक्सिजनची उपलब्धता होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी ऑक्सिजनचे भाव अव्वाच्या सव्वा वाढविलेले असून, काळाबाजार चालू झाला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेविषयी इंडियन मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्षांनी वेळोवेळी प्रशासनाशी चर्चा केली आहे. तसेच स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही निवेदन देऊन वस्तुस्थिती सांगितली आहे. आता तर परिस्थिती अजून बिकट होत आहे. प्रशासनाने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत चालू राहण्यासाठी व्यवस्था करावी. ऑक्सिजनच्या अभावी एखाद्या रुग्णालयात रुग्ण दगावल्यास त्याची पूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहिल.

दरम्यान, यापूर्वी पुण्यात केवळ ऑक्सिजनअभावी पत्रकाराचा मृत्यू झाला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. हे वास्तव थेट विधानसभेत मांडण्यात आले. नगरमध्ये कोरोनाचे रोज किमान 800 रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची उपलब्धता असणे आवश्यक आहे. इंडियन मेडिकल असोशिएशननेच हे पत्र पाठविले असल्याने जिल्ह्यातील स्थितीचा अंदाज येतो. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून समिती नियुक्त

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात ऑक्सिजन पुरवठा संनियंत्रणासाठी समिती स्थापन केलेली आहे. समितीचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी आहेत. तसेच त्यामध्ये सदस्य म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तसेच सचिव म्हूणून अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त हे आहेत. या समितीकडे आॅक्सिजनबाबत समन्वय, शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना आवश्यक माहिती देणे, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याबाबत उत्पादकांशी समन्वय करणे, वाटप करण्याची जबाबदारी आहे. असे असले, तरी ऑक्सिजनची कमतरता नगरमध्ये होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख