राहुरी : देवळाली प्रवरा येथे आज (मंगळवारी) पहाटे पावणेसहा वाजता एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या घरात घुसून, धुमाकूळ घातला. तरुणीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन, विदेशी बनावटीच्या पिस्तुलातून तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. तरुणीच्या डोक्याला किरकोळ जखमी झाली. तरुणाला अंत्यवस्थ अवस्थेत लोणी येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
विक्रम उर्फ विकी रमेश मुसमाडे (वय २६, रा. देवळाली प्रवरा) असे गावठी पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याचे गावातील एका मुलीबरोबर एकतर्फी प्रेम संबंध होते. मुलगी बी. ई. (स्थापत्य अभियांत्रिकी) शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिच्या आई-वडिलांचे पाच सहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आजी व चौदा वर्षांच्या लहान बहिणीबरोबर मुलगी घरात राहते. मुलीचे चुलते कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
आज पहाटे साडेपाच वाजता एका मित्राला बरोबर घेऊन, विकीने मुलीच्या घराच्या मागील संरक्षक भिंतीवरून घरात प्रवेश केला. पहाटे नगरपालिकेचे पिण्याचे पाणी येते. मुलीची आजी पाणी भरीत होती. मुलगी स्वयंपाक घरात झाडलोट करीत होती. विकीने थेट स्वयंपाक घरात प्रवेश केला. "माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न कर." असे त्याने मुलीला सांगितले. त्यावर मुलीने "मी तुझ्यावर प्रेम करीत नाही. तुझा माझा काही संबंध नाही. तू घरातून निघून जा. असे ठणकावले." त्यावर दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून मुलीची लहान बहीण स्वयंपाक घरात आली. तिला विकीने मारहाण केली. मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. मुलीचे डोके भिंतीवर आपटले. रागाच्या भरात विकीने कमरेचे पिस्तूल काढून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली.
जखमी अवस्थेत मुलीने चुलत्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. विकी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या मित्रांनी त्याला लोणी येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख , सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल, सहायक फौजदार पोपट टिक्कल, पोलीस नाईक वाल्मिक पारधी, पोलीस कॉन्स्टेबल गणेश फाटक यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी न्यायवैद्यक तपासणीसाठी पथकाला बोलविण्यात आले आहे. घटनेत वापरलेले पिस्तूल स्वयंपाक घरात तसेच पडलेले होते. मुलीला राहुरी येथे रुग्णालयात हलविण्यात आले. तिची प्रकृती स्थिर आहे. विकीने डोक्यात तिरपी गोळी झाडली आहे. त्यामुळे अति रक्तस्रावामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीतही महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या घटना घडू लागल्या आहेत. तसेच जिल्ह्यात दरोडेही होऊ लागले असल्याने पोलिसांचा ताण अधिक वाढू लागला आहे.
Edited By - Murlidhar Karale

