आमदार मोनिका राजळे यांना विरोध करणारे भाजप कार्यकारिणीतून `आऊट` - Out of the BJP executive who opposes MLA Monica Rajale | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार मोनिका राजळे यांना विरोध करणारे भाजप कार्यकारिणीतून `आऊट`

राजेंद्र सावंत
रविवार, 19 जुलै 2020

भारतीय जनता पक्षाची जम्बो कार्यकारीणी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी जाहीर केली आहे. यामधे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, संजय बडे, सुनिल पाखरे, नागनाथ गर्जे यांना डावलण्यात आले.

पाथर्डी : भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारिणीत युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल गर्जे व ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांना डावलले आहे. विधानसभेला आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवारीला थेट विरोध कऱणारे अमोल गर्जे, संजय बडे, सुनिल पाखरे यांना संघटनेत बेदखल करण्यात आले आहे. खुनशी राजकाणामुळे भाजपा संघटनेचे नुकसान होण्याची भिती येथील जुने भाजपा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. 

भारतीय जनता पक्षाची जम्बो कार्यकारीणी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी जाहीर केली आहे. यामधे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, संजय बडे, सुनिल पाखरे, नागनाथ गर्जे यांना डावलण्यात आले. सुनिल पाखरे व नागनाथ गर्जे यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध करुन भाजपाच्या मुळ निष्ठावंताना डावलले असून, मुंडे समर्थकांची कोंडी केल्याची भावना व्यक्त केली आहे. आगामी काळात आमदार राजळे यांना जाहीरपणे विरोध करुन त्यांना हे खुनशी राजकारण महागात पडेल, असा इशारा पाखरे व गर्जे यांनी दिला आहे.

ज्येष्ठ नेते अशोक गर्जे हे स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांचे समर्थक आहेत. पक्ष संघटनेत अनेक पदावर त्यांनी काम केले. त्यांचा मुलगा अमोल गर्जे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाअध्यक्ष म्हणुन काम पाहत होते. त्यांना बाजुला करण्यात आले आहे. पाखरे व गर्जे यांनी निवेदनात नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाला यामुळे संघटना पातळीवर नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना अशी आघाडी झाल्याने भाजपाला येथे समर्थ विरोधक तयार झाला आहे. त्यात अंतर्गत गटबाजी उफळून आल्याने भाजपाला त्याचा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

आमदार राजळे यांनी टाळले : पाखरे

आम्ही भाजपाचे व मुंडे समर्थक म्हणून काम करीत आहोत. आमदार मोनिका राजळे यांनी आम्हाला टाळले आहे. मात्र आम्ही भाजपाचेच आहोत. वेळ येईल तेव्हा नाराजी व्यक्त करू. आज संघटनेत त्यांचा वरचष्मा असला, तरी मुंडे समर्थकांना डावलणे त्यांना अडचणीचे ठरेल, असे मत भाजपचे कार्यकर्ते सुनिल पाखरे यांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख