भाजपला रोखण्यासाठी पक्षांतरासारख्या घटनांवर मार्ग काढावा लागेल : मुश्रीफ - In order to stop BJP, we have to find a way out of incidents like defection: Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपला रोखण्यासाठी पक्षांतरासारख्या घटनांवर मार्ग काढावा लागेल : मुश्रीफ

मुरलीधर कराळे
गुरुवार, 9 जुलै 2020

आपल्या नेत्यांशी चर्चा करून प्रश्न सुटू शकतात. असे काही होईल, असे कोणालाही वाटले नव्हते, तथापि, आगामी काळात याबाबत दक्षता घ्यावी लागेल.

नगर : राज्यात महाआघाडी सरकार चांगले काम करीत आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजप महाआघाडीच्या चुका काढण्यासाठीच कायम तत्पर असतो. पारनेरमधील नगरसेवकांचे पक्षांतराचे नाट्य योग्य नाही. असे होईल, असे यापूर्वी वाटले नव्हते. आगामी काळात भाजपला रोखायचे असेल, तर त्यावर मार्ग काढावा लागेल, असे भाष्य जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

संगमनेर येथे कोरोनाविषयक आढावा बैठकिनंतर मुश्रीफ बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, आमदार डाॅ. सुधीर तांबे तसेच मान्यवर उपस्थित होते.

पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. दोन्ही पक्ष महाआघाडी सरकारमध्ये असल्याने एकमेकांत पक्षांतर योग्य नाही, हा आघाडी धर्म नाही, त्यामुळे त्या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठविण्यात आले. याबाबत राज्य पातळीवर घडामोडी झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातही याबाबत चर्चा झाली. याबाबत भाष्य करताना मुश्रीफ म्हणाले, की महाआघाडीत मित्र पक्ष असल्याने दोन्हीही पक्षातील नेत्यांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. दोन्ही पैकी कोणत्याही पक्षात राहिले, तरी त्यांना अडचणी येण्याचे कारण नाही. आपल्या नेत्यांशी चर्चा करून प्रश्न सुटू शकतात. असे काही होईल, असे कोणालाही वाटले नव्हते, तथापि, आगामी काळात याबाबत दक्षता घ्यावी लागेल. याचा गैरफायदा भाजप घेईल. त्यामुळे त्यावर मार्ग काढावा लागेल.

संगमनेर जिल्ह्यातील मृत्यूदर सर्वाधिक

संगमनेर येथील कोरोनाविषय आढावा घेताना मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. संगमनेर तालुक्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 9 टक्के आहे. हा दर सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल.नोव्हेंबरपर्य़ंत जग कोरोनामुक्त होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

संगमनेरमध्ये टेस्ट वाढविण्याची गरज

संगमनेरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत आहे. मात्र रुग्णसंख्या वाढतच आहे. त्याला आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी लोकांचेही सहकार्य हवे. नागरिकांनी विनाकामाचे फिरण्याचे बंद करायला हवे. आवश्यकतेनुसार बाहेर पडल्यास सामाजिक अंतर, तोंडाला मास्क आदी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. संगमनरमध्ये कोरोनाला आळा घालण्यासाठी कोरोनाविषयक टेस्ट वाढविण्याची गरज आहे. जेवढ्या जास्त टेस्ट घेवून रुग्ण हाती लागतील, तेवढे कोरोना लवकर बरा होऊ शकेल. त्यामुळे टेस्टच्या संख्येत वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख