कोल्हापूरच्या कथित डाॅक्टर स्वागत तोडकरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश - Order to file a case against alleged doctor Swagat Todkar of Kolhapur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

कोल्हापूरच्या कथित डाॅक्टर स्वागत तोडकरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

आनंद गायकवाड
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

सोशल मिडीयात केलेल्या जाहिरातीवरुन कोल्हापूर येथील कथित डॉक्टर स्वागत तोडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिला आहे.

संगमनेर : कोणतीही परवानगी नसताना टोनो- 16 या नावाचे प्रतिकारशक्ती वाढविण्याचे औषध संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे विक्रीसाठी उपलब्ध असल्याबाबत सोशल मिडीयात केलेल्या जाहिरातीवरुन कोल्हापूर येथील कथित डॉक्टर स्वागत तोडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिला आहे.

कोल्हापूरमधील तोडकर याच्याविरुद्ध यापूर्वीही कोल्हापूर तसेच संगमनेर येथेही बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे. जीवन संकेत या यू ट्युब चॅनलवर प्रतिकारशक्ती वाढवण्य़ासाठी उपयुक्त असल्याचा दावा करीत, टोनो 16 या औषधाची जाहिरात करण्यात आली असून, हे औषध घारगाव (ता. संगमनेर) येथील गुरूदत्त मेडीकल स्टोअर्समध्ये उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. या बेकायदा प्रकारामुळे तोडकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमाचा भंग केल्याचा तसेच औषध व जादुटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचा आदेश तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रविंद्र ढेरंगे यांना दिला आहे.

कोणतीही वैद्यकिय पदवी नसताना उपचार करण्याच्या आरोपावरुन कोल्हापूरमध्ये तीन वर्षांपूर्वी स्वागत तोडकर व कोमल पाटील यांच्याविरोधात महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने मार्च 2017 मध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली होती. सुटका झाल्यावर तोडकरने न्यू महाद्वार रोडवर संजीवनी निसर्ग आधार केंद्र सुरू केले. यू ट्यूब आणि सोशल मिडियावर त्याची भाषणे ऐकून राज्यभरातील रुग्ण कोल्हापुरात जातात. तसेच त्याने पुणे व संगमनेर येथेही केंद्र सुरु केले. तेथेही त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोनाच्या काळात लोकांच्या मनातील भीतीचा गैरवापर करण्याचा प्रकार दिसून आल्याने आरोग्य विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख