नगर : जिल्ह्यातील 767 पैकी 61 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून, एका गावात केवळ एकच अर्ज आल्याने, तेथील निवडणूक रद्द झाली. उर्वरित 705 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सध्या सुरू आहे.
बहुतेक ठिकाणी दोन किंवा तीन पॅनल असून, जिल्ह्यातील नेत्यांनी मात्र या वेळी हात आखडता घेतलेला दिसतो. स्थानिक पातळीवर तुम्हीच लढा, अशीच काहीशी भूमिका बहुतेक नेत्यांनी घेतलेली आहे.
नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले तसेच शिवसेनेचे नेते जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई गावात इतर नेत्यांनी आव्हान दिल्याने, या दोन नेत्यांसाठी या वेळी लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. आपल्या ग्रामपंचायती बिनविरोध न झाल्याचे शल्य त्यांना असणे स्वाभाविक आहे.
नेवासे तालुक्यातील सोनईत मंत्री गडाख यांच्या गटाला माजी खासदार तुकाराम गडाख यांनी आव्हान दिल्याने, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. मंत्री गडाखांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते.
नगर तालुक्यात माजी मंत्री कर्डिले यांच्यासमोर त्यांचेच पुतणे असलेले युवा नेते रोहिदास कर्डिले व नव्याने विरोधक तयार झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अमोल जाधव यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे कर्डिले यांना गड शाबूत ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
अकोले तालुक्यातील 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. एका ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाली. उर्वरित ठिकाणी भाजपचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांचे गट अधिक सक्रिय मानले जातात. असे असले, तरी कॉंग्रेसचे नेते मधुकर नवले, राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे व शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनीही जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. धुमाळ यांचे गाव धुमाळवाडी, तसेच नवले यांचे गाव नवलेवाडी येथे त्यांना विरोधकांचा सामना करण्याची वेळ आली आहे.
जामखेड- कर्जतमध्ये भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या गटांमध्ये, जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या आधिपत्याखाली आणण्यासाठी विशेष चुरस निर्माण झाली आहे. बहुतेक गावांत पक्षविरहित निवडणुका होत असल्या, तरीही संबंधित नेत्यांची छत्रछाया त्यांच्यावर आहे.
पारनेर व नगर तालुक्यांतील काही गावांमध्ये आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व आहे. त्यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले. मतदारसंघातील केवळ नऊ ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिला. लंके यांचे गाव असलेले हंगे गाव बिनविरोध झाल्याने, ती जमेची बाजू राहिली. असे असले, तरी अन्य गावांमध्येही कोणत्याही नेत्याने विशेष लक्ष घातले नाही.
कोणीही निवडून या; दोन्ही आपलेच
संगमनेर तालुक्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच आधिपत्याखाली बहुतेक ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींत थोरात गट विरुद्ध थोरात गट, अशीच लढत दिसून येत आहे. या तालुक्यातील काही गावांवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. तेथेही विखे विरुद्ध विखे गट, अशा लढती होत आहेत. काही गावे मात्र याला अपवाद आहेत. अशीच स्थिती राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये आहे. बहुतेक ठिकाणी विखे पाटील यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये लढती होत आहेत.

