विरोधकांची बोलती बंद ! आमदार लहामटे यांनी सरकारविरोधातच उचलले हे पाऊल - Opponents stop talking! This step was taken by MLA Lahamate against the government | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधकांची बोलती बंद ! आमदार लहामटे यांनी सरकारविरोधातच उचलले हे पाऊल

शांताराम काळे
मंगळवार, 21 जुलै 2020

विरोधकांनी शेतकऱ्यांचा आवाज बनून हे काम बंद पाडणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधिकारी आमदारांनीच काम बंद पाडून विरोधकांची बोलतीच बंद करून टाकली.

अकोले : निळवंडे येथील खोदाईचे काम आज राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे व कार्यकर्त्यांनी बंद पाडले. शेतकऱ्यांच्या पाइपलाइन आधी दुरुस्त करून द्या, तरच काम करा, असे धोरण घेतल्याने ठेकेदाराचीही बोलती बंद झाली. सत्ताधारी पक्षातील आमदारांनीच काम बंद करून सरकारला दिलेला हा आहेर मानले जाते.

विरोधकांनी शेतकऱ्यांचा आवाज बनून हे काम बंद पाडणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधिकारी आमदारांनीच काम बंद पाडून विरोधकांची बोलतीच बंद करून टाकली.

आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी निळवंडे कॅनाॅल संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. आज तक्रारी निवारण करण्यासाठी म्हाळादेवी येथील चालू असलेल्या कॅनाॅलच्या कामावर आमदारांनी भेट दिली. अनेक शेतकऱ्यांच्या पाइपलाइन तुटत असल्याचे पाहून ते रागावले. जोपर्यंत पाइपलाइन जोडणार नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेवून काम बंद पाडले.

याबाबत बोलताना आमदार लहामटे म्हणाले, लाॅकडाऊनच्या कालावधीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली, तेव्हा या विषयावर चर्चा झाली होती. काम सुरू असताना पाइपलाइन तुटल्यास लगेचच जोडणार असल्याचे त्यावेळी सांगितले होेत. मात्र संबंधित खात्यातील अधिकारी, कर्मचारी हे शेतकऱ्यांचे एकत नाहीत. जयंत पाटील व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करुन लवकरच हा प्रश्न निकाली काढला जाईल. या जमीनी या १९८३ साली संपादित झाल्या व डिझाईन झाले, मात्र कालानुरूप डिझाईनमध्ये बदल होणे आवश्यक होते. असा बदल झाला नाही. तसेच अनेक ठिकाणी रस्ते होणे आवश्यक होते, मात्र अनेक शेतकरी रस्ते नसल्यामुळे त्यांना आपली शेती करता येत नाही. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारी एकून घेतल्या जात नाहीत. त्यामुळे जोपर्यंत पाइपलाइन दुरुस्त करून दिल्या जात नाहीत, तोपर्यंत हे काम सुरू करून देणार नाही.

या वेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आशोक भांगरे, अकोले राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, युवक राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष रविंद्र मालुंजकर उपस्थित होते

गुरुवारी बैठकित होणार निर्णय

महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी हिताचे सरकार असून, शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी बांधिल आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी, तहसीलदार, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक करुन तोडगा काढण्यात येईल. तोपर्यंत कॅनाॅलचे काम बंद ठेवण्यात येईल.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख